प्रशासन काय करतेय ?
By Admin | Updated: May 25, 2015 02:46 IST2015-05-25T02:46:47+5:302015-05-25T02:46:47+5:30
शहरातील मॉल व मल्टीप्लेक्समध्ये प्रवेश करतांना प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाते.

प्रशासन काय करतेय ?
मॉलमध्ये सुरक्षेचा गोलमाल : नागपूरकरांचा प्रश्न
नागपूर : शहरातील मॉल व मल्टीप्लेक्समध्ये प्रवेश करतांना प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाते. त्यावरून हे मॉल सुरक्षेबाबत किती जागरुक आहेत, असा सर्वसामान्यांचा समज असतो. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. संपूर्ण इमारतींमध्ये आवश्यक सुरक्षा उपायांच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याची बाब लोकमतने रविवारच्या अंकात ‘मॉलमध्ये सुरक्षेचा गोलमाल’ या शिर्षकांतर्गत प्रकर्षाने उघडकीस आणली.
यामध्ये नॅशनल बिल्डिंग कोड आॅफ इंडियाचे नियम काय सांगतात आणि शहरातील इमारतींमध्ये त्याची किती पूर्तता करण्यात आली आहे याची वस्तुस्थिती अतिशय भयावह असून साध्या एक्झिट गेटबाबतही मॉलचालक गंभीर नसल्याची बाब लोकमतने उघडकीस आणली. हे वृत्त वाचून नागपूरकरांनाही आपण या मॉल मध्ये किती सुरक्षित आहोत, असा प्रश्न पडला आहे. हजारो लोकांचा जीव धोक्यात असतांना शासन व प्रशासन काय करीत आहे, ते किती गंभीर आहेत, असा प्रश्न नागपूरकरांनी उपस्थित केला आहे.
मॉलमध्ये सुरक्षा मानकांचे पालन होत नाही, ही गोष्टच आश्चर्यचकित करणारी आहे. लोकमतने याबाबत मोठा खुलासा केला आहे. ही गंभीर बाब असून एकूणच शहरासाठी धोकादायक आहे. तेव्हा शासन आणि प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी डॉ. विवेक चंदनानी यांनी केली आहे.
डॉ. निर्मल सिंह यांनी सुद्धा याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. सामान्य सिनेमागृहांपेक्षा आम्ही मल्टीप्लेक्समध्ये अधिक सुरक्षित आहोत, असेच आजवर आम्हाला वाटत होते. परंतु मल्टीप्लेक्समध्ये तर सुरक्षा नियमांबाबत कमालीचे उल्लंघन होत आहे. नागरिकंना जागरुक करण्याबाबत लोकमतचे आभार सुद्धा त्यांनी व्यक्त केले आहे.
मॉलमध्ये अनेक अनियमितता आहेत. परंतु त्यांच्याविरुद्ध कुणी बोलायला तयार नाही, लोकमतने ही अनियमितता पुढे आणली असून आता नागरिकांनी याला गांभीर्याने घ्यावे, असे डॉ. उषा साकुरे यांचे म्हणणे आहे. मॉल व मल्टीप्लेक्समध्ये फायरसंबंधी सुरक्षा उपायांचे उल्लंघन होत असल्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून एक चांगला विषय लोकांपुढे आणला आहे. परंतु या प्रकारच्या नियमांची अवहेलना शासकीय इमारतींमध्ये सुद्धा होत आहे. न्यायालय आणि महापालिकेमध्ये तरी फायरशी संबंधित सर्व सुविधा उपलब्ध आहेत का, असा प्रश्न जे.पी. शर्मा यांनी उपस्थित केला आहे. विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू यांनी सुद्धा या वृत्ताचे कौतुक केले आहे. अतिशय अभ्यासपूर्ण हा विषय मांडण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंबंधात आपण न्यायालयात जनहित याचिकासुद्धा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोबतच नियमंचे पालन होत नाही, ही बाब खरी असली तरी ती केवळ एकच बाजू आहे. याची दुसरी बाजू सुद्धा समोर यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पार्किंग शुल्काबाबतही तक्रारी
अनेक नागरिकांनी मॉल व मल्टीप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारले जात असल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. मॉलमध्ये येणाऱ्या व्यक्तीसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे, परंतु त्यांनी पार्किंगचाही धंदा सुरू केला आहे. हे सुद्धा नियमांच्या विरुद्ध आहे. हा सर्व प्रकार माहिती असूनही प्रशासन कारवाई का करीत नाही, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.