भिंतींना ओल, उखडलेले स्लॅब अन् जीर्ण इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:09 IST2021-08-22T04:09:34+5:302021-08-22T04:09:34+5:30
नागपूर : ६६ ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर नियंत्रण ठेवणाऱ्या नागपूर पंचायत समितीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाच जीव मुठीत धरून कामकाज करावे लागते. पंचायत ...

भिंतींना ओल, उखडलेले स्लॅब अन् जीर्ण इमारत
नागपूर : ६६ ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर नियंत्रण ठेवणाऱ्या नागपूर पंचायत समितीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाच जीव मुठीत धरून कामकाज करावे लागते. पंचायत समितीचे सध्याचे कामकाज जीर्ण झालेल्या बचत भवनात सुरू आहे. या इमारतीची अतिशय दैना झाली आहे. पंचायत समितीची ही वास्तू शहरातील सिव्हिल लाईन्स परिसराला एक डागच आहे.
नागपूर तहसील कार्यालय, आमदार निवास, एमटीडीसीचे कार्यालय अशा टुमदार इमारतीच्या परिसरात पंचायत समितीची ही इमारत आहे. इमारतीच्या बाहेरील भागाला शेवाळ माखलेले आहे. खिडक्यांची तावदाने तुटलेली आहेत. खिडक्यांना गंज चढला आहे. बीडीओच्या कक्षातील स्लॅबला पोपडे पडलेले आहेत. इमारतीच्या भिंतींना ओल आली आहे. त्याच भिंतीवर विद्युत उपकरणे जोडलेली आहेत. ओलीमुळे कागदपत्रे खराब होत आहेत. जिन्याच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. पावसाळ्यात पाण्याचे लोट कार्यालयात वाहतात. पावसाळ्यात भिंतींना ओल असल्याने कर्मचाऱ्यांना शॉक लागण्याची भीती आहे. इमारत तर इतकी जीर्ण झाली की, कधी काय पडेल, कुणाचा अपघात होईल, काहीच सांगता येत नाही.
- ४ वर्षांपासून तयार होतेय नवी इमारत
नागपूर पंचायत समितीची इमारत ही ब्रिटिशकालीन होती. ती वास्तू तोडून नवीन पंचायत समितीची भव्य इमारत बांधण्यात येत आहे. २०१६ मध्ये नव्या इमारतीसाठी चार कोटी ४१ लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. २०१८ पासून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने पंचायत समितीचे कार्यालय बाजूलाच असलेल्या बचत भवनात स्थलांतरित करण्यात आले होते. नवीन इमारत अजूनही बनलेली नसल्याने आता बचत भवनच पंचायत समितीचे कार्यालय झाले आहे.