लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या ठिकाणी भाजप निवडून येते त्याच ठिकाणी काँग्रेस पक्षाला आक्षेप असतो. महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेसचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा कुठलाही आक्षेप त्यांनी घेतला नाही. त्यावेळी मतदार याद्या बरोबर होत्या का, असा सवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपुरात रविवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
निवडणुकीच्या काळात मतदार याद्या जाहीर होतात. त्यावेळी सर्वच पक्षांना आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला जातो. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक लाख बूथवर याद्या लावल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने आक्षेप घेतला नाही. निवडणुकीच्या काळातही आक्षेप घेतले नाही. मात्र, निवडणुका झाल्यावर सात महिन्यांनंतर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला. विधानसभा निवडणुका ज्या मतदान याद्यांवर झाल्या त्याच याद्यांवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे काही आक्षेप असतील तर ते त्यांनी आत्ताच निवडणूक आयोगाकडे मांडावे. नाहीतर पुन्हा निवडणूक हरल्यानंतर अपयशाचे खापर मतदार यादीवर फोडू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये १७ हजार बूथ लावून आम्ही नवीन मतदार नोंदणी केली. त्यात ३४ हजार मतदार वाढले. मतांची वाढ होणे म्हणजे मतदार यादी चुकीची आहे असे होत नाही. राहुल गांधींना शंका असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्या तपासून घ्याव्यात, यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लावावे, असे बावनकुळे म्हणाले.
महायुती शक्य नाही तेथे मैत्रीपूर्ण लढती होणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मी महाराष्ट्रामध्ये प्रवास करीत असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुतीतच लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, जिथे शक्य नाही तिथे लढत मैत्रीपूर्ण करून महायुतीला धक्का बसणार नाही याची काळजी स्थानिक नेत्यांनी घ्यायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस, पंचनामे होणारराज्यात ज्या ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे, त्या त्या ठिकाणी पंचनामे करून एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या निकषांनुसार नुकसान भरपाई देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नंदुरबारसह अनेक आदिवासी जिल्ह्यांमध्ये धर्मातराच्या उद्देशाने बांधलेले अनधिकृत चर्च हटवण्याचे निर्देश संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.