‘एनआरआय’कडून ‘ट्रम्प’ विजयाचे स्वागत
By Admin | Updated: November 10, 2016 02:56 IST2016-11-10T02:56:10+5:302016-11-10T02:56:10+5:30
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या ‘एनआरआय’मध्ये (नॉन रेसिडेन्ट इंडियन्स) संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

‘एनआरआय’कडून ‘ट्रम्प’ विजयाचे स्वागत
‘मि. प्रेसिडेंट’कडून अपेक्षा :
‘व्हिसा’ नियमांत बदल नको
नागपूर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या ‘एनआरआय’मध्ये (नॉन रेसिडेन्ट इंडियन्स) संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मूळचे नागपूरकर मात्र सध्या अमेरिकेत असणाऱ्या ‘एनआरआय’ने ‘मिस्टर प्रेसिडेन्ट’चे स्वागत तर केले आहे, मात्र आता ‘व्हिसा’ नियम कडक होतात की काय अशी चिंता त्यांना लागली आहे. या नियमांत बदल व्हायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ने काही ‘एनआरआय’च्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. प्रचाराच्या सुरुवातीला अनेक भागांमध्ये हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने भारतीय होते. मात्र प्रचार संपत येत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उधळलेली स्तुतिसुमने तसेच येथील संस्कृतीबाबत काढलेले गौरवोद्गार यामुळे स्थिती बदललेली दिसून आली. ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व काहीसे वादग्रस्त असले तरी जगातील सर्वात मोठ्या महासत्तेचे ते राष्ट्राध्यक्ष झाले असून याबाबत त्यांचे स्वागत करायलाच हवे, अशी भावना ‘एनआरआय’कडून व्यक्त करण्यात आली.
अमेरिकेत रोजगारासाठी जाण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एच१बी’ व्हिसाच्या नियमांत बदल करण्याचा मानस ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. अमेरिकेतील ‘आयटी’ कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय आहेत. मात्र अमेरिकेतील तरुणांना अगोदर प्राधान्य मिळावे यासाठी ‘व्हिसा’ नियमांमध्ये बदल होतात की काय अशी चिंता वाटते आहे. नियम कठोर झाले तर अनेक ‘एनआरआय’ला परतावे लागू शकते. शिवाय कंपन्यांचेदेखील नुकसान होईल. त्यामुळे ‘व्हिसा’चे नियम आहे तसेच रहावे, अशी अपेक्षा एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असणारे योगेश नेमाडे यांनी व्यक्त केली.
‘एनआरआय’च्या नातेवाईकांमध्ये दिसली उत्सुकता
नागपुरातील अनेक तरुण अमेरिकेत नोकरीसाठी स्थायिक झाले आहेत. ही संख्या हजारांच्या घरात आहे. त्यामुळे अशा ‘एनआरआय’च्या कुटुंबीयांची नजर सकाळपासूनच इंटरनेट व दूरचित्रवाणी संचांवर खिळली होती. डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिंटन यांच्यापैकी नेमके कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता होती. (प्रतिनिधी)