पक्ष-उमेदवारांच्या ‘बूथ’वर ‘वेलकम कोरोना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:13 AM2020-12-02T04:13:02+5:302020-12-02T04:13:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. निवडणुकीसाठी जवळपास सर्वच मतदान केंद्रांजवळ ...

'Welcome Corona' at party-candidates' booths | पक्ष-उमेदवारांच्या ‘बूथ’वर ‘वेलकम कोरोना’

पक्ष-उमेदवारांच्या ‘बूथ’वर ‘वेलकम कोरोना’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. निवडणुकीसाठी जवळपास सर्वच मतदान केंद्रांजवळ उमेदवारांकडून मतदारांच्या मदतीसाठी ‘बूथ’ लावण्यात आले होते. मात्र या ‘बूथ’वर सहकार्य कमी आणि कार्यकर्त्यांचे मीलनच जास्त होत असल्याचे चित्र होते. बहुतांश ठिकाणी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे खुलेआम उल्लंघन झाले. कोरोनाचा धोका कायम असतानादेखील ‘फिजिकल डिस्टन्सिंग’देखील नव्हते व अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी ‘मास्क’देखील घातले नव्हते. या ‘बूथ’च्या माध्यमातून ‘कोरोना’लाच आमंत्रण देण्याचा प्रकार सुरू आहे का, असा प्रश्न मतदारांकडूनच विचारण्यात आला.

संपूर्ण मतदारसंघात ३२२ तर नागपूर जिल्ह्यात १६४ मतदार केंद्र होती. या मतदान केंद्रांच्या २०० मीटरच्या अंतराबाहेर दोन, तीन किंवा त्याहून जास्त पक्ष व उमेदवारांकडून ‘बूथ’ स्थापन करण्यात आले होते. मतदारांना मतदानयादीतील क्रमांक व केंद्रातील मतदान खोली क्रमांक कळावा या उद्देशाने हे ‘बूथ’ स्थापन करण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडून देण्यात येते. मात्र संबंधित ‘बूथ’वर एक टेबल व दोन खुर्च्या असाव्यात आणि कुठल्याही पद्धतीने तेथे गर्दी होऊ नये असे स्पष्ट निर्देश आयोगातर्फे देण्यात आले आहेत.

परंतु उपराजधानीत अनेक ‘बूथ’ हे मतदान केंद्रांपासून १०० मीटरच्या अंतरावरच होते. याशिवाय बहुतांश ‘बूथ’वर दोनहून अधिक टेबल तसेच डझनभर खुर्च्या दिसून आल्या. काही ‘बूथ’वर तर २० ते २५ कार्यकर्ते व पदाधिकारी दिसून येत होते. शिवाय ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ नावापुरतेदेखील नव्हते व अनेक जण तर मास्क न लावताच बसले होते. निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे खुलेआमपणे उल्लंघन होत असतानादेखील प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई झाली नाही.

Web Title: 'Welcome Corona' at party-candidates' booths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.