एका टीसीवर १३ कोचचा भार
By Admin | Updated: January 16, 2017 01:51 IST2017-01-16T01:51:40+5:302017-01-16T01:51:40+5:30
रेल्वेगाड्यांची संख्या दरवर्षी वाढत असून, त्यात काम करणाऱ्या टीसींची संख्या मात्र मागील अनेक

एका टीसीवर १३ कोचचा भार
तोकड्या संख्येंची प्रवाशांना डोकेदुखी : नागपूर विभागात ६०० टीसींची आवश्यकता
दयानंद पाईकराव नागपूर
रेल्वेगाड्यांची संख्या दरवर्षी वाढत असून, त्यात काम करणाऱ्या टीसींची संख्या मात्र मागील अनेक वर्षांपासून वाढली नसल्यामुळे प्रवाशांच्या समस्यांत मोठी वाढ झाली आहे. एका टीसीला १३ कोच सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सध्या १२०० टीसींची गरज असताना केवळ ६२५ टीसी कार्यरत आहेत. रेल्वे बोर्डाने टीसीला उत्पन्न वाढविण्याचे ‘टार्गेट’ वाढवून दिले. परंतु हे ‘टार्गेट’ पूर्ण करताना प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. गाडीत एकच टीसी असल्यामुळे अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असून, रेल्वे प्रशासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
रेल्वेगाडी आपल्या नियोजित ठिकाणावरून सुटल्यानंतर प्रवासी आणि टीसी यांचा ताळमेळ असणे गरजेचे असते. परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात टीसींची संख्या दुपटीने कमी आहे. यामुळे एका टीसीला १२ ते १३ कोच सांभाळण्याची वेळ आली आहे. प्रवाशांना प्रवासात अनेक समस्या येतात. रेल्वेगाडी कधी अस्वच्छ असते. प्रवासी अनेकदा चेनपुलिंग करतात. कधी असामाजिक तत्त्व प्रवाशांच्या बर्थचा ताबा मिळवितात. कधी प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास टीसीच पुढील स्थानकावर कळवून डॉक्टरची सुविधा उपलब्ध करून देतो. परंतु टीसीला रेल्वे बोर्डाने उत्पन्नाचे टार्गेट वाढवून दिल्यामुळे तो आपले टार्गेट पूर्ण करण्यात व्यस्त असतो. प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास त्याला वेळच मिळत नाही. अशा स्थितीत प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यातील टीसींची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.