वूई वाँन्ट जस्टीस...

By Admin | Updated: November 26, 2014 01:07 IST2014-11-26T01:07:16+5:302014-11-26T01:07:16+5:30

काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे,

Wei Want Justus ... | वूई वाँन्ट जस्टीस...

वूई वाँन्ट जस्टीस...

बालकांची मानवी शृंखला : पंतप्रधानांना पाठविले १.१० लाख पत्र
नागपूर : काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून उपराजधानीतील ५० शाळांमधील हजारो बालकांनी आज ‘वुई वॉंट जस्टीस’चा सूर काढून वर्धा मार्ग दणाणून टाकला.
आठ वर्षाच्या युग चांडक याचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेच्या तीन वर्षापूर्वी कुश कटारिया या आठ वर्षाच्या बालकाचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे बालकांच्या होत असलेल्या हत्येबाबत त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी सेंटर पॉईंट ग्रुप आॅफ स्कूल्स आणि युग फाऊंडेशनच्यावतीने आज लोकमत चौक ते पंचशील चौकादरम्यान मानवी शृंखला तयार करण्यात आली. यानिमित्त ‘युग की पुकार’ या संकल्पनेवर ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्र साकारले. आंदोलनात १८ वर्षाखालील मुलांवर होणाऱ्या दुष्कृत्यांसाठी एका विशेष न्यायालयाचे गठन करून आरोपींना १०० दिवसाच्या आत कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘काय कृती कराल तुम्ही जेंव्हा युगच्या जागेवर असू आम्ही’, ‘परत नको वार एकदाच करा निर्धार’, ‘आधी कुश आता युग, काय होती दोघांची चूक’, ‘हर बेटाबेटी अपनी हे सुरक्षा इनकी करनी है’, ‘बचपन सुरक्षित होगा तो देश सुरक्षित होगा’ असे वाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन लक्ष वेधले.
यावेळी समीर मेघे, माजी मंत्री अनिस अहमद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय पाटील, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, माजी आमदार यादवराव देवगडे यांनी आंदोलनात भेट दिली. यशस्वितेसाठी प्रकल्प समन्वयक संजय वलीवकर, अरुण देव उपाध्याय, मुक्ता चॅटर्जी, डॉ. मुकेश चांडक यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
युगच्या आईचे डोळे पाणावले
आंदोलनात युगचे वडील मुकेश चांडक आणि त्याची आई उपस्थित होती. युगच्या हत्येनंतर शहरातील हजारो बालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहून युगच्या आईचे डोळे पाणावले आणि तिला आपला हुंदका आवरता आला नाही. माझा युग तर गेला परंतु इतर मुलांची सुरक्षा वाढविण्याची गरज असल्याचे तिने यावेळी सांगितले.
दुसरा युग, कुश होऊ नये
हिवरीनगरच्या सेंट झेविअर्स स्कूलची विद्यार्थिनी दिव्या भाजीपाले हिने दुसऱ्यांना युग, कुशसारख्या घटना होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजात शांतता प्रस्थापित करून बालकांना सुरक्षा देण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी तिने केली.

Web Title: Wei Want Justus ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.