विवाह मुहूर्त निश्चित, तयारीही झाली होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:42+5:302021-03-15T04:07:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत व नंतर १४ ...

The wedding moment was fixed, preparations were made ... | विवाह मुहूर्त निश्चित, तयारीही झाली होती...

विवाह मुहूर्त निश्चित, तयारीही झाली होती...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत व नंतर १४ मार्चपर्यंत बंदी घातली. आता १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन आहे. मंगल कार्यालय, लॉन्स, सभागृह वा तत्सम ठिकाणी विवाहसोहळा तसेच गर्दी जमेल अशा कार्यक्रमांवर बंदी आहे. या कालावधीत विवाहाचा मुहूर्त निश्चित झालेल्यांची मोठी अडचण झाली असून त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

मुहूर्तानुसार अनेकांनी मंगल कार्यालय, लॉन्सची आधीच नोंदणी केली आहे. पत्रिकाही वितरित करण्यात आल्या. भोजन, मंडप वा तत्सम व्यवस्थांसाठी आगाऊ रक्कमही दिली गेली. अकस्मात विवाहसोहळ्यावर बंदी आल्याने लग्नाची तयारी करणारे कुटुंबीय अडचणीत सापडले आहेत. याचा सर्वाधिक आर्थिक फटका वधुपित्याला बसण्याची शक्यता आहे.

शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मर्यादित संख्येत कोरोनाचे नियम पाळून लग्नसोहळ्यांना परवानगी होती. परंतु अनेक लग्नांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने संसर्गाचा धोका वाढला. लग्नसोहळ्यातील गर्दी कोरोना प्रसाराचे केंद्र ठरत असल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाने मंगल कार्यालये व लॉनमधील समारंभांना निर्बंध घातले. आता २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यात पुन्हा वाढ झाल्यास मोठी अडचण होणार आहे.

...

घरगुती समारंभही धास्तीतच

२१ मार्चनंतर लग्नाच्या तारखा निश्चित करून तयारी करायची की नाही. याबाबतही संभ्रम आहे. आधीच निश्चित असलेले लग्नसमारंभ कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून निवडक लोकांच्या उपस्थितीत करण्याची काही कुटुंबांनी तयारी केली आहे. परंतु लग्नसमारंभ म्हटले की गर्दी होणारच. अशा परिस्थितीत महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता असल्याने घरगुती लग्नसमारंभ असलेले कुटुंबीय धास्तीत आहेत.

....

अ‍ॅडव्हान्स मिळणार का?

मंगल कार्यालय नोंदणी, मंडप, भोजन व्यवस्था, निमंत्रण पत्रिकांची छपाई यावर मोठी रक्कम खर्ची पडली. पत्रिकांचे वितरणही झाले. ऐन वेळी निर्बंध घातल्यामुळे मंगल कार्यालय, लॉन्सधारक वा भोजन व्यावसायिकांकडून नोंदणीसाठी दिलेली रक्कम परत मिळेल की नाही, याची चिंता अनेक कुटुंबांना पडली आहे.

...

बंदी कुठपर्यंत?

प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत लग्नसोहळ्यांवर बंदी राहणार आहे. यामुळे संबंधितांना कुटुंबातील विवाहसोहळे पुढे ढकलावे लागतील. नव्या तारखा निश्चित करता येणार नाहीत. जेव्हा कधी परवानगी मिळेल तेव्हा मंगल कार्यालयात नोंदणी मिळेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या कुटुंबात एप्रिल किंवा मे महिन्यात विवाह होणार आहे, त्यांना नेमके काय करावे हे सुचेनासे झाले आहे.

Web Title: The wedding moment was fixed, preparations were made ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.