लग्नसमारंभ, व्यवसायांवर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:07+5:302021-04-30T04:11:07+5:30

नागपूर : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर सुरू झालेले लग्नसमारंभ आणि व्यवसायांवर सध्या कोरोनाचे ग्रहण लागले आहे. प्रशासनाच्या कठोर निर्बंधांमुळे लग्नकार्य ...

Wedding ceremonies, corona crisis on businesses | लग्नसमारंभ, व्यवसायांवर कोरोनाचे संकट

लग्नसमारंभ, व्यवसायांवर कोरोनाचे संकट

नागपूर : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर सुरू झालेले लग्नसमारंभ आणि व्यवसायांवर सध्या कोरोनाचे ग्रहण लागले आहे. प्रशासनाच्या कठोर निर्बंधांमुळे लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत होत आहे. त्यामुळे लग्नासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी थांबली असून, संबंधित व्यवसाय ठप्प झाला आहे. गेल्या वर्षीही उन्हाळ्यात केंद्र सरकारच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांसाठी लग्नाचा सीझन फिका ठरला होता.

गेल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, सराफा, कापड, भांडे या व्यवसायँवर सर्वाधिक परिणाम झाला होता. यासह लग्नकार्याशी संबंधित मंगल कार्यालय, लॉन, ब्रॅण्ड, कॅटरिंग, मंडप-डेकोरेशन, लायटिंग या सीझनच्या कामांवरही परिणाम झाला होता. यंदाही अनेकांचा रोजगार हिरावला आहे. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत सर्वाधिक लग्नकार्य झाले. याशिवाय १३ एप्रिल ते १५ जुलैपर्यंत ३७ मुहूर्त असल्याचे सांगितले जात आहे; तर २० जुलै ते १५ नोव्हेंबरपर्यंत लग्नाचे मुहूर्त नाहीत. तसे पाहता एप्रिल महिन्यात बोटांवर मोजण्याएवढेच लग्नकार्य झाले आहेत; पण आता १५ मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने या तारखेपर्यंत लग्नसमारंभ होणार नाहीत. त्यामुळे मे महिन्याचे १५ दिवस आणि जून व जुलै महिन्यांत लग्ने होतील, पण त्याच्याशी संबंधित व्यवसाय किती होईल, हे सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी मंगल कार्यालय आणि लॉनमालकांना अनेकांची बुकिंगची रक्कम परत द्यावी लागली होती. याशिवाय यंदा उन्हाळ्यातील लग्नाच्या बुकिंगची रक्कम परत करावी लागत आहे. त्यांचा फटका व्यावसायिकांना बसत आहे.

सराफी व्यापारी राजेश रोकडे म्हणाले, यावर्षी लग्नाचा सीझन संपला आहे. कोरोनामुळे अनेकांनी लग्न रद्द केले आहेत. लहान कार्यक्रम करून ते घरीच लग्नकार्य पार पाडत आहेत. त्यामुळे सराफ व्यावसायिकांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पुढे त्यात सुधारणा होण्याची काहीही शक्यता नाही. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर आणि लॉकडाऊन हटल्यानंतर काही व्यवसायांची अपेक्षा करता येईल.

Web Title: Wedding ceremonies, corona crisis on businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.