‘सायबर हॅकेथॉन’मधून मिळाले सोशल माध्यमांवर नजर ठेवण्याचे अस्त्र; नागपुरात सोशल मीडिया लॅब व सायबर लॅबची सुरुवात
By योगेश पांडे | Updated: May 27, 2025 22:34 IST2025-05-27T22:33:41+5:302025-05-27T22:34:38+5:30
सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने केला जाऊन अफवा पसरवणे, हिंसाचाराला चिथावणी देणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देणे व राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणे, असे प्रकार घडत आहेत.

‘सायबर हॅकेथॉन’मधून मिळाले सोशल माध्यमांवर नजर ठेवण्याचे अस्त्र; नागपुरात सोशल मीडिया लॅब व सायबर लॅबची सुरुवात
योगेश पांडे
नागपूर : सायबर गुन्हेगारी व सोशल मीडियावरील आक्षेपार्ह बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना मोठे बळ मिळाले आहे. ‘सायबर हॅकेथॉन’मधून मिळाले सोशल माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी मिळालेले ‘टूल’ गरूडदृष्टी व सायबर लॅबचे मंगळवारी उद्घाटन झाले. सायबर पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने केला जाऊन अफवा पसरवणे, हिंसाचाराला चिथावणी देणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देणे व राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणे, असे प्रकार घडत आहेत. अशा सायबर गुन्ह्यांच्या तपासात मदत व्हावी व आक्षेपार्ह पोस्टवर बारीक नजर असावी, यासाठी पोलिसांसाठी सायबर लॅब व सोशल मीडिया लॅब तयार करण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून डिजिटल पुरावे एकत्रित करण्यात मोठी मदत मिळणार आहे. सोशल मीडिया लॅबअंतर्गत गरूड दृष्टी सॉफ्टवेअर ॲपच्या मदतीने सोशल माध्यमांवर वॉच ठेवण्यात येईल. यावेळी सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त लोहित मतानी, निकेतन कदम, महक स्वामी, शशिकांत सातव, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक बळीराम सुतार प्रामुख्याने उपस्थित होते.
ही कामे होणार
- कीवर्ड आधारित शोध व मॉनिटरिंग- गुन्हेगारी, दहशतवाद, हिंसाचार यांसारख्या विषयांवरील कीवर्ड्स व हॅशटॅग्सचा थेट ट्रॅकिंग.
- फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स या माध्यमांवरून रिअल-टाइम मॉनिटरिंग.
- टेक्स्टवर आधारित इमेज सर्च.
- स्वयंचलित इंटेलिजन्स जनरेशन.
- कंटेंट टेकडाउन कोऑर्डिनेशन.
- आयटी कायदा कलम ७९ अंतर्गत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सशी समन्वय.
- आयटी कायदा कलम ६९ अंतर्गत राज्य गुप्तवार्ता विभागाशी सहकार्य.
- कायदेशीर कार्यवाहीसाठी अधिकृत लॉग्स ठेवले जातील.
या टूल्सचा उपयोग
सीडीआर ॲनालिसिस टूल : हे टूल कॉल डिटेल रेकॉर्ड विश्लेषणासाठी वापरण्यात येईल. कॉल पॅटर्न्स, सोशल नेटवर्क्स, व लोकेशन डेटा ओळखण्यासाठी याचा फायदा होईल.
सेलिब्राईट सॉफ्टवेअर : मोबाइल डिव्हाइसेसमधील माहिती मिळवण्याकरिता याचा वापर होईल. हे फॉरेन्सिक सॉफ्टवेअर आहे.
- गार्गोईल इन्व्हेस्टिगेटर एमपी : संगणकांवरील मालवेअर व प्रतिबंधित सॉफ्टवेअर ओळखण्यासाठी वापरले जाणारे अत्याधुनिक डिजिटल फॉरेन्सिक टूल आहे.
- सेलिब्राईट प्रिमीयम : सर्व प्रकारच्या मोबाइल फोनवरील डेटाची अनलॉकिंग व विश्लेषणासाठी वापरले जाणारे विशेष सॉफ्टवेअर आहे.
या पोस्टवर राहणार बारीक लक्ष
सायबर पोलिस ठाण्यातील पथकाकडून गरूडदृष्टीच्या माध्यमातून राजकीय संवेदनशीलता, धार्मिक भावना, गुन्हेगारी कृती, व्हीआयपींना धोका व इशारे देणाऱ्या पोस्टवर बारीक लक्ष ठेवण्यात येईल. या प्रणालीच्या माध्यमातून जनरेट होणारा इंटेलिजन्स अहवाल स्थानिक पोलिस ठाण्यांना पाठविण्यात येईल. आक्षेपार्ह पोस्ट्ससाठी रिपोर्टिंग प्रणाली या टूलमध्ये आहे. आपत्तीजनक पोस्ट्स, व्हिडीओज, अकाउंट्स हे अधिकृत मार्गाने रिपोर्ट करता येतील.
फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर
फेशियल रेकग्निशनद्वारे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटविण्यात येईल. सार्वजनिक सोशल मीडिया इमेजेस व व्हिडीओजमधून एआयवर आधारित चेहऱ्यांची ओळख पटविण्याची प्रणाली यात उपलब्ध आहे.