नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील झाडाझडती दरम्यान शस्त्रे आढळल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ मार्चच्या पहाटे पाच खतरनाक कच्चे कैदी पळाल्यानंतर कारागृहाची मोठ्या प्रमाणावर झाडाझडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान एका भाजयुमो नेत्याच्या खुनातील सूत्रधाराकडे दोन माऊझर (देशी पिस्तुल) आणि चार चायनीज चाकू आढळून आले. ही शस्त्रे जप्त झाल्याची पोलिसांकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र कारागृहातून न्यायालयात पेशीसाठी येणाऱ्या आरोपींकडून ही माहिती बाहेर आली. कारागृहात मोठ्या प्रमाणावर मोबाईल आढळून येत आहेत. ते अधिकृतपणे जप्तही केले जात आहेत. कारागृहाची आणखी बदनामी होऊ नये किंवा आपल्यावर बालंट येऊ नये, यासाठी कारागृह अधिकाऱ्यांकडून ही शस्त्रे कारागृहातील विहिरीत फेकून शस्त्रांच्या या प्रकरणावर पडदा टाकला जाण्याची शक्यता अधिक आहे. (प्रतिनिधी)
कारागृहात आढळली शस्त्रे ?
By admin | Updated: April 10, 2015 02:10 IST