लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पक्ष संघटनेत नुसते खुर्चीला चिटकून बसण्यात अर्थ नाही. प्रदेशाध्यक्षपद ही एक संधी आहे. त्यात पक्षसंघटनेसाठी जे काही करता येईल ते करू. पदग्रहणानंतर दोन महिन्यांत आपण १४ जिल्ह्यांचा दौरा केला. आपण मांडत असलेल्या पक्षाच्या वैचारिक भूमिकेला चांगला प्रतिसाद आहे. वैचारिक लढाई स्पष्टपणे लहू तेवढी संघटना बळकट होईल व बळकट संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढून सत्ता गाठता येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
सद्भावना शांती यात्रेनंतर सपकाळ यांनी 'लोकमत' भवनला सदिच्छा भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, लोकप्रतिनिधी व संघटनेतील पद या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कुणी खूप वर्षापासून एका पदावर आहे म्हणून त्याला हटवावे, हेदेखील योग्य नाही. तर त्याचा परफॉर्मन्स पाहणेही आवश्यक आहे. आपण संघटनात्मक बदलासाठी पावले टाकली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमले असून त्यांचा अहवाल आल्यावर बदलाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मी माझ्यासाठी एक कार्यकाळ ठेवला असून 'एक व्यक्ती एक पद' याची अंमलबजावणी मी स्वतः पासून केली आहे. प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर राजीव गांधी पंचायतराज अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्षपद दुसऱ्याला द्यावे, असा प्रस्ताव मी पाठविला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सपकाळांचा अॅक्शन प्लॅन
- ४० वर्षांखालील तरुणांना ब्लॉक अध्यक्ष म्हणून नियुक्त करणार.
- प्रदेश पदाधिकारी नियुक्त करताना तो लोकप्रतिनिधी किंवा निवडणूक लढलेला असावा.
- व्यवहार व तत्त्वांशी सांगड घालून पक्षात काही ऑपरेशन करणार.
- महाविकास आघाडीही राजकीय अपरिहार्यता आहे. त्यामुळे आतापासून मनसुबे मांडण्यात अर्थ नाही.
- ईव्हीएम विरोधात लढा लढणार, व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आग्रह धरणार.
शक्तिपीठ मार्ग अदानीला शक्ती देण्यासाठीमध्य भारतातील खनिज संपदा अदानीच्या गोव्यातील पोर्टपर्यंत थेट पोहोचविता यावी, यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला गेला आहे. हा मार्ग करण्याची कुणाचीही मागणी नाही. शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध आहे. सरकारकडे लाडकी बहीण, एसटी कर्मचारी, शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. मात्र, शक्तिपीठ मार्गासाठी ८८ हजार कोटी देण्यास सरकार आसुसलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अदानींवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यांची तेथील यंत्रे येथे गडचिरोलीत फिरली पाहिजे यासाठी हे सर्व केले जात आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.