लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलीकडच्या काळात धर्मातरांच्या अनेक घटना जबरदस्तीने होताना पाहायला मिळत आहेत. पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती यासाठी तयार करण्यात आली होती. तिचा अहवाल प्राप्त झाला आहे. लवकरच येणाऱ्या अधिवेशनात धर्मातरविरोधी कायदा पारित केला जाईल, असे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले.
बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना डॉ. भोयर म्हणाले, अनिल परब हे विरोधी पक्षात असल्याने कारवाईचे आरोप करतात. योगेश कदम यांच्या नावाने कुठलाही डान्स बारचा परवाना नाही. मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात योग्य निर्णय घेतील. परब यांनी स्वतःच्या पक्षातील लोकांनी काय केले आहे, तेसुद्धा स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना पाठवावे, असा सल्लाही भोयर यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, कुठलाही हनी नाही आणि ट्रॅप नाही. नाना पटोले यांनीही सभागृहात पेन ड्राइव्ह दाखवावा. पण आता कुठला पेन ड्राइव्ह आहे ते दाखवत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यपालांनी मराठीचा सन्मान करावामहाराष्ट्राचे राज्यपाल हे प्रथमपद आहे. मराठीचा सन्मान त्यांनी करायला पाहिजे. ज्यांना मराठी येत नाही, ते पण महाराष्ट्रात येऊन मराठी शिकतात, थोडा वेळ लागतो. मराठीचा त्यांना सराव नसेल पण महाराष्ट्रात आल्यानंतर उत्तम मराठी अनेकजण शिकून जातात, असेही डॉ. भोयर म्हणाले.