- कोरोना महामारी विरूद्धच्या लढ्यात धार्मिक, सामाजिक संस्था मैदानात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारी विरूद्धचा लढा एकट्याने नाही तर शासन-प्रशासनच्या खांद्याला खांदा देऊन जिंकता येणार आहे. त्याच दृष्टिकोनातून पुन्हा एकदा सामाजिक आणि धार्मिक संस्था मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे, सामूहिक प्रयत्नांतून कोरोना संक्रमणाला मात देण्याची आशा बळावली आहे. काही संस्थांनी धर्मस्थळांना कोविड केअर सेंटरमध्ये परिवर्तित करण्याचा तर काहींनी ऑक्सिजन घराघरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. कुठे प्लाझ्मा दान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. अनेक संस्था नागरिकांना अनावश्यकरीत्या घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. ज्यांच्याजवळ एक वेळचे अन्न नाही त्यांना सहकार्य केले जात आहे. यासोबतच एक गोष्ट म्हणजे, कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईत विजयी लक्ष्य प्राप्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, तो संयम होय.
--------
घराघरात पोहोचत आहे कॉन्सनट्रेटर मशीन
अनेक कोरोना संक्रमित रुग्णांची ऑक्सिजन पातळी व्यवस्थित आहे. मात्र, कोरोना जीवावर बेतू नये, या भीतीने अनेक जण इस्पितळांच्या चकरा मारत आहेत. वेळेत ऑक्सिजन उपलब्ध झाल्यास, अशा रुग्णांचे प्राण वाजविण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. अनेक संस्थांनी स्व:खर्चावर या मशिन्स उपलब्ध करवून देण्यास सुरुवात केली आहे. श्री माहेश्वरी युवक संघाने नागपूर जिल्हा माहेश्वरी सभेच्य सहयोगाने नागपुरात २० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन नागरिकांसाठी उपलब्ध करवून दिल्या आहेत. ५ व ७ लिटर क्षमतेच्या या मशीन्स नागरिकांसाठी संजीवनी ठरत आहेत. यासाठी नागरिकांकडून सहकार्यही मिळत असल्याचे संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. ज्यांना वेळेवर ऑक्सिजन मिळत आहे, त्यांचा हॉस्पिटलचा शोध संपत आहे. ते स्वत:च दुसऱ्या रुग्णांसाठी मशीन परत करत आहेत. जास्तीत जास्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी समाजाकडूनही यासाठी निधी प्राप्त होत आहे. अशाच तऱ्हेने रोटरी क्लब ऑफ नागपूर मिडटाऊननेही काही दिवसापूर्वी पुढाकार घेत ४ मशीन्सद्वारे हा उपक्रम सुरू केला. क्लबने काही आणखी मशीन्सचे बुकिंग केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच या मशीन्स उपलब्ध करवून दिल्या जात असल्याचे संस्थेचे पदाधिकारी वीरेंद्र पात्रीकर यांनी सांगितले. यासाठी अध्यक्ष निशिकांत काशिकर, सचिव डॉ. प्रतीक्षा मायी, संदीप देशपांडे, समीर बेंद्रे, विवेक देशपांडे, अभिजित देशपांडे प्रयत्न करत आहेत.
--------------
प्लाज्मा दान शिबिराचे आयोजन मंगळवारी
पांचपावली येथील गुरुनानक पुरा स्थित गुरुद्वारा श्री गुरुनानक दरबारनेही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. येथे २० एप्रिलला सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंत नि:शुल्क ॲण्टीबॉडी टेस्ट आणि प्लाज्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चिकित्सक ॲण्टीबॉडी वाढविण्याचे प्रकारही सांगतील. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी प्रवासी मजूर आणि गरजूंसाठी गुरुद्वारा ट्रस्टने दररोज लंगरची व्यवस्था केली होती. गुरुद्वारा परिसरात हजारो लोकांसाठी दोन्ही वेळा भोजन पॅकेट विविध संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण नागपुरात वितरित केले होते.
.................