लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील जखमी छोटा मटका वाघाची प्रकृती ढासळण्याकरिता कारणीभूत असलेल्या वन विभागाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कान उघाडणी केली. लंगडत चालतानाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर छोटा मटकाची आम्हाला काळजी वाटली. परंतु, वन विभागाने त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले. वन्यजीवांचे संरक्षण करणे वन विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे, पण त्यांना याचा विसर पडला, असे न्यायालय म्हणाले.
छोटा मटकाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ताडोबाच्या बफर क्षेत्रात साम्राज्य निर्माण केलेल्या छोटा मटकाची गेल्या बुद्धपौर्णिमेच्या दिवशी 'ब्रह्मा' वाघासोबत लढाई झाली होती. त्यात ब्रह्मा ठार तर, छोटा मटका गंभीर जखमी झाला. छोटा मटकाच्या एका पायाचे हाड मोडले आहे. पायाची जखमही चिघळली आहे. तो याच गंभीर अवस्थेत दोन महिने जंगलात फिरत होता. परंतु, वन विभागाने त्याच्यावर तातडीने प्रभावी उपचार केले नाही. शेवटी उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर वन विभागाने त्याला बेशुद्ध करून पकडले. सध्या त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.
वन विभागाला नोटीस जारी
- न्यायालयाने वन विभाग, राज्य वन्यजीव मंडळ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आदींना नोटीस बजावून छोटा मटकाच्या मुद्यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
- तसेच, त्याच्यावरील उपचाराची माहिती घेण्यासाठी प्रकरणावर ११ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. अॅड. यशोवर्धन सांबरे यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.