‘हम दो हमारे वो’ने केली हसवणूक
By Admin | Updated: September 21, 2015 03:09 IST2015-09-21T03:09:42+5:302015-09-21T03:09:42+5:30
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी प्रेक्षकांच्या हास्याने सभागृह फुलले.

‘हम दो हमारे वो’ने केली हसवणूक
रोटरीचे आयोजन : देशपांडे सभागृहात प्रयोग
नागपूर : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी प्रेक्षकांच्या हास्याने सभागृह फुलले. रविवारी सायंकाळी ‘हम दो हमारे वो’ हे विनोदी नाटक सादर करण्यात आले. कौटुंबिक कथानकावर बेतलेल्या या विनोदी नाटकाने रसिकांची चांगलीच हसवणूक केली.
नाटकात प्रमुख भूमिकेत अनुप सोनी होते. त्यांनी समीर सक्सेना हे पात्र रंगविले तर त्यांची पत्नी सलोनीची भूमिका स्मिता बन्सल यांनी केली. याशिवाय धीरज आणि कोमलबाबाच्या भूमिकेतील कलावंतांनीही दमदार अभिनयाने रसिकांना हास्यरसात चिंब केले. परिस्थितीसापेक्ष विनोदाला रसिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
एखाद्या बाबाच्या नादी लागून कुटुंबाला मनस्ताप होतो. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने लोक मानसिक आणि आर्थिक त्रस्तता ओढवून घेत असतात. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खा. विजय दर्डा, डीआयजी योगेश देसाई आणि विभागीय आयुक्त अनुपकुमार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला सुधादेवी लद्धड, नीलेश पनपालिया, सुनील लद्धड, उमेश लद्धड, सुभाष लाहोटी, महेश लाहोटी, मनोज सोनी उपस्थित होते.
रोटरी इंटरनॅशनल संस्थेचे अध्यक्ष राहुल लद्धड यांनी स्वागतपर भाषण केले. संस्थेने मागील १५ वर्षात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय भविष्यात संस्थेने आखलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहितीही त्यांनी विस्ताराने दिली. रोटरी इंटरनॅशनल ही गैरसरकारी सामाजिक कार्य करणारी विश्वस्तरीय संस्था आहे. संस्थेच्यावतीने आयोजित या नाटकातून कौटुंबिक मनोरंजनासह समाजाला सार्थक संदेश देण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला. रोटरी इंटरनॅशनल नाटकातून मिळालेल्या निधीचा उपयोग महिला आणि मुलांसाठी हायजिन, हृदय शस्त्रक्रिया, स्क्वेंट सर्जरी आदींसाठी करणार आहे. रोटरीच्या या कार्याची यावेळी सर्व रसिकांनी प्रशंसा केली. (प्रतिनिधी)