गरिबांच्या जीवनात स्थिरता आणणारे संशोधन हवे
By Admin | Updated: April 2, 2017 02:51 IST2017-04-02T02:51:05+5:302017-04-02T02:51:05+5:30
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच संशोधनावर भर दिला पाहिजे.

गरिबांच्या जीवनात स्थिरता आणणारे संशोधन हवे
नितीन गडकरी : रामदेवबाबा अभियांत्रिकी
महाविद्यालयात ‘हॅकाथॉन’ स्पर्धेला प्रारंभ
नागपूर : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच संशोधनावर भर दिला पाहिजे. संशोधन करताना ते आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे व स्वदेशी असले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संशोधन हे गरीब व वंचितांच्या जीवनात स्थिरता आणणारे हवे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित ‘हॅकाथॉन’ या विधायक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते शनिवारी बोलत होते. नागपुरात श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ही स्पर्धा सुरू झाली असून येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्रालयाशी संबंधित विविध समस्यांवर दोन दिवसांत विद्यार्थी ‘हायटेक‘ समाधान शोधणार आहेत.
याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे संचालक दिलीप जाजू, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेचे डॉ. दिलीप मालखेडे उपस्थित होते. संशोधन, नाविन्य, तंत्रज्ञान, उद्यमशीलता यांची विद्यार्थ्यांनी कास धरली पाहिजे. ज्ञानाचा संपत्तीत उपयोग होणे आवश्यक आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे देशभरात ७८६ अपघातप्रवण स्थळे शोधण्यात आली असून त्यांच्या सुधारणांसाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले. ‘हॅकाथॉन’ स्पर्धेच्या माध्यमातून समोर आलेल्या सूचनांचा निश्चित विचार केला जाईल, असे आश्वासनदेखील गडकरी यांनी यावेळी दिले. यावेळी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष चंद्रकांतभाई ठाकर, सरचिटणीस गोविंदलाल अग्रवाल, सचिव राजेंद्र पुरोहित, श्यामसुंदर राठी, संजय अग्रवाल, द्वारकाप्रसाद गुप्ता, प्राचार्य डॉ.राजेश पांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रतिश्रुती सिंह-अग्रवाल यांनी संचालन केले.
नागपुरात १६ राज्यातील ८४ चमू आल्या असून यात एकूण ६८० विद्यार्थी व मार्गदर्शकांचा समावेश आहे. ही स्पर्धा सलग ३६ तास चालणार असून २ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत विद्यार्थी ‘प्रोग्रॅमिंग’ करणार आहेत.(प्रतिनिधी)