लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसर हादरला आहे. या स्फोटाच्या वेळी तेथील इकॉनॉमिक युनिट व आजूबाजूला जवळपास ३० ते ४० कामगार काम करत होते. आजूबाजूच्या गावांतून कामगारांच्या नातेवाइकांनी मिळेल त्या साधनाने सोलारकडे धाव घेतली. मात्र, त्यांच्या जीवलगांचे नेमके काय झाले याची कुठलीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे अस्वस्थ, अगतिक आणि डोळ्यात अश्रू अशा अवस्थेत शेकडो लोकांच्या मनात केवळ प्रार्थनाच सुरू होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये रात्रपाळीत जास्त लोक कामावर नसतात. रात्री ३० ते ४० लोक संबंधित युनिटमध्ये काम करत होते. त्यातील किती लोक सुखरूप आहे याची माहिती दीड वाजेपर्यंत कळू शकली नव्हती. या स्फोटाची माहिती मिळताच सर्वच कामगारांच्या नातेवाइकांनी सोलारकडे धाव घेतली. महामार्गावर शेकडो लोक एकत्रित झाले होते. मात्र, आतमध्ये नेमके काय झाले व कामगार कसे आहेत याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते. कमीत कमी आमचे नातेवाईक सुरक्षित आहेत का हे तरी सांगा असेच अनेक जण म्हणत होते. बहुतांश कामगार हे आजूबाजूच्या गावांतीलच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
डिसेंबर २०२३ मधील स्फोटाच्या काळ्या आठवणींनी काटा
सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये १७डिसेंबर २०२३ रोजी भीषण स्फोट झाला होता व त्यात ९ कामगारांचा मृत्यू झाला होता. हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच ती घटना घडली होती. सीपीसीएच-२ युनिटमध्ये झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसर अक्षरशः हादरला होता. त्या युनिटमध्ये कोळसा खाणींसाठी वापरण्यात येणारे कास्ट बूस्टर उत्पादित करण्यात येत होते. स्फोटानंतर क्षणात पूर्ण इमारत पत्त्यांसारखी खाली कोसळली होती. त्या स्फोटाच्या आठवणींनी उपस्थितांच्या अंगावर काटा आला होता.
आजपर्यंत असा आवाज ऐकला नाही
'लोकमत'ने बाजारगाव परिसरातील काही नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांच्या बोलण्यातून स्फोटाची तीव्रता जाणवली. आजपर्यंत आम्ही असा आवाज ऐकला नव्हता आणि इतका हादरादेखील बसला नव्हता असा दावा त्यांनी केला. दरम्यान, या स्फोटाबाबत माहितीसाठी सोलारच्च्या कार्यालयात संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.