नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेने केलेल्या मागणीनुसार आम्ही मोबाईल सीडीआर उपलब्ध करून दिले. न्यायालयात दाखविण्यात आलेले सीडीआर आम्हीच दिलेले आहेत, अशी साक्ष दोन वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या युग चांडक हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिली. पुणेच्या बीएसएनएल येथे ज्युनियर टेलिकॉम आॅफिसर असलेले गोकुळ रसाळ हे आपली साक्ष देताना म्हणाले की, नोव्हेंबर २०१४ मध्ये आपण नोडल आॅफिसमध्ये काम करीत असताना नागपूर शहर गुन्हे शाखेने एका बीएसएनएलच्या मोबाईल नंबरचा सीडीआर मागितला. आमचे सिनियर माळी यांनी आपल्या सहीनिशी सविस्तर सीडीआर दिला. न्यायालयात दाखवण्यात आलेला सीडीआर आपणच दिलेला असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथीलच व्होडाफोनचे नोडल आॅफिसर फ्रान्सिस फरेरा यांनी आपल्या साक्षीत सांगितले की, सप्टेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान आपणास वेगवेगळ्या तीन व्होडाफोन मोबाईलच्या क्रमांकाचे सीडीआर मागण्यात आले. एक मोबाईल संदीप कटरेच्या नावाचा होता. सीडीआर दिल्यानंतर आम्ही भारतीय पुरावा कायदा कलम ६५ ब अन्वये प्रमाणपत्रही दिल्याचे फरेरा यांनी सांगितले. गुरुवारी त्यांची साक्ष अर्धवटच राहिली. ती उद्या शुक्रवारीही राहील. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी मुकेश चांडक यांचे वकील अॅड. राजेंद्र डागा, अॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींचे वकील अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. मनमोहन उपाध्याय, अॅड. प्रमोद उपाध्याय, अॅड. राजेश्री वासनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मोबाईल सीडीआर आम्हीच दिले
By admin | Updated: April 10, 2015 02:18 IST