कोरोना रुग्णांना औषधांसाठी बाहेरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:53+5:302021-03-17T04:08:53+5:30
अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे याठिकाणी अद्याप कोविड सेंटरच्या साेयीसुविधांचा पत्ता ...

कोरोना रुग्णांना औषधांसाठी बाहेरचा रस्ता
अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे याठिकाणी अद्याप कोविड सेंटरच्या साेयीसुविधांचा पत्ता नाही. अशातच आता होमक्वारंटाईन होत असलेल्या कोरोना रुग्णांना औषधांसाठी बाहेरच्या खासगी औषधी दुकानांचा रस्ता दाखविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढल्यानंतर आणि काही कोरोना रुग्णांशी चर्चा केल्यानंतर ही सत्य बाब पुढे आली आहे.
उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. याठिकाणी दररोज चाचणीसाठी नागरिक येतात. अहवाल मिळाल्यानंतर काहींना होमक्वारंटाईन तर काहींना भिवापूर येथील कोविड सेंटरमध्ये परस्पर जाण्याची सूचना दिली जाते. त्यानंतर होमक्वारंटाईन रुग्णांची माहिती, विचारणा आणि तपासणी करण्यासाठी आशा वर्कर घरोघरी पोहोचतात. रुग्णांची माहिती घेतल्यानंतर औषधी वितरणाचीही जबाबदारी संबंधित आशा वर्करकडे असते. उमरेड तालुक्यातील ग्रामीण भागात १२२ तर शहरामध्ये २२ आशा वर्करकडे या महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी सोपविली गेली आहे. असे असले तरी शासनाकडील नि:शुल्क औषधीच आम्हास मिळाली नाही, अशी ओरड रुग्णांची आहे.
याबाबत सत्य जाणून घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामीण रुग्णालय गाठत चौकशी केली असता, आशा वर्करकडे औषधांचा पुरवठाच केला जात नसल्याची गंभीर बाब समजली. आशा वर्करला औषधांचा पुरवठा होत नसेल तर मग कोरोना रुग्णांना औषधांचे वितरण होणार तरी कसे, असा संतापजनक प्रश्न निर्माण झाला आहे. भिवापूर कोविड सेंटरला रुग्ण गेल्यानंतर याठिकाणीसुद्धा रुग्णांना औषधांची चिठ्ठी सोपविली जाते. बाहेरील महागड्या औषधी लिहून दिल्या जातात. उमरेड येथील कोविड सेंटर बंद झाल्यापासून ही समस्या असल्याचीही बाब बोलली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. व्ही. पातूरकर यांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आहे.
....
औषधी जातात कुठे?
कोरोना रुग्णांसाठी शासनाकडून औषधांचा पुरवठा होत नाही का, असा प्रश्न उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात औषधी वितरण कर्मचाऱ्यास केला. आम्ही औषधी भिवापूर केअर सेंटरला पाठवितो. रुग्णांकडे देत नाही, अशी बाब समोर आली. औषधांचा तुटवडा नसेल आणि योग्य पुरवठा होत असेल तर मग या औषधी नेमक्या कुणाच्या घशात जातात, असा सवाल विचारला जात आहे. काही खासगी औषधांच्या दुकानात तर हा पुरवठा होत नाही ना, अशीही शंकेची बाब पुढे येत आहे. याप्रकरणाची गंभीरतेने चौकशी झाल्यास बरेच घबाड उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
....
पाचगाव, बेला, सिर्सी आणि मकरधोकडा या केंद्रांतर्गत कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्यांना आशा वर्करच्या माध्यमातून औषधी पुरविल्या जात आहेत. ग्रामीण भागात ही समस्या नाही.
- डॉ. संदीप धरमठोक,
तालुका आरोग्य अधिकारी, उमरेड
....
माझ्या कानावर ही बाब आली आहे. बाहेरून औषधे बोलाविण्यासाठी चिठ्ठी देऊ नका. अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. उमरेड येथे कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर येत्या काही दिवसात ही समस्या सुटेल. मी याकडे गांभीर्याने लक्ष देईल.
- डॉ. एस. एन. खानम, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय उमरेड.