‘त्या’ पुस्तकाविरोधात गुरुभक्तांमध्ये संतापाची लाट

By Admin | Updated: August 24, 2016 03:00 IST2016-08-24T03:00:45+5:302016-08-24T03:00:45+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत वर्णन करणाऱ्या संबंधित

The wave of anger against the book | ‘त्या’ पुस्तकाविरोधात गुरुभक्तांमध्ये संतापाची लाट

‘त्या’ पुस्तकाविरोधात गुरुभक्तांमध्ये संतापाची लाट

भावना दुखावणाऱ्या पुस्तकावर बंदीची मागणी : नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत वर्णन करणाऱ्या संबंधित पुस्तकामुळे समस्त गुरुदेव भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पंढरपूरचे ह.भ.प. महाराज वक्ते यांनी लिहिलेल्या ‘संत तुकाराम महाराज-सदेह वैकुंठागमन’ या पुस्तकावर संपूर्ण बंदी लावण्याची मागणी गुरुदेवभक्तांनी केली आहे. यासाठी श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूरतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना निवेदन सादर करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्याला कशाचीही तोड नाही. राष्ट्रसंतांनी रचलेल्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये ग्रामविकासाच्या माध्यमातून राष्ट्राच्या विकासाचे स्रोत सांगितले आहेत. धार्मिकतेचे अवडंबर करण्यापेक्षा मानव समाजाच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून जनतेला सांगितला आहे. घराघरामध्ये ग्रामगीता एक आदर्श ग्रंथ म्हणून वाचली जाते. राष्ट्रसंतांच्या विचारांना मानणारा पुरोगामी विचारांचा समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. या महापुरुषाच्या महान ग्रंथाबाबत अत्यंत विकृतपणे ‘...सदेह वैकुंठगमन’ या पुस्तकात वर्णन केले आहे. एखादा विकृत माणूसच अशा प्रकारचे वर्णन करू शकतो, अशी टीका श्री गुरुदेव सेवाश्रमाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी केली. महाराज वक्तेच्या पुस्तकामध्ये राष्ट्रसंताबाबतही खोटे आरोप केले गेले आहेत. लेखकाने भारतीय संविधानाचा सुद्धा अर्वाच्च भाषेत अपमान केला आहे. वास्तविक राष्ट्रसंतांनी कधीही धार्मिक अवडंबराला थारा दिला नाही. त्यांची शिकवण समानतेची होती. कदाचित हीच बाब धर्मांधाना खटकत असल्याचा आरोप रक्षक यांनी केला. राष्ट्रसंतांना मानणाऱ्या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे, दोन संप्रदायांमध्ये भांडणे लावणे आणि राष्ट्रसंतांचे विचार समाजामधून हद्दपार करण्याचे धर्मांधाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप रक्षक यांनी केला. विकृत मनोवृत्तीच्या लेखकाने धर्मांधतेची गरळ ओकल्याची टीका त्यांनी केली.
मंगळवारी असंख्य गुरुभक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वक्तेंच्या पुस्तकावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली. विविध सामाजिक संघटनांचा यात सहभाग होता. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुभक्तांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे यावेळी आश्वासन दिले. या प्रतिनिधी मंडळामध्ये अ‍ॅड. अशोक यावले, रुपराव वाघ, प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी, अ‍ॅड. कृ पाल भोयर, रवी मानव, खडतकर, मोहनदास चोरे, बालू शिंदे, सचिन काळे, अंकित राऊत, गोपाळराव सिंगूरकर, देवीदास लाखे, डॉ. गोपाल हजारे, सुभाष बांगडे, दशरथ कोठे, भाऊराव तायवाडे, सुशीला लाडसे, ज्योती निचड, बाबाराव पाटील, गंगाध्रा घोडमारे, मयूर पाटणे, राकेश गिरी, नितीन सूर्यवंशी, नीळकंठ कळंबे आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)

Web Title: The wave of anger against the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.