मनपात पाणी पेटले
By Admin | Updated: April 19, 2016 06:33 IST2016-04-19T06:33:28+5:302016-04-19T06:33:28+5:30
शहराच्या काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मागणी करूनही टँकर मिळत नसल्याने नागरिक

मनपात पाणी पेटले
नागपूर : शहराच्या काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मागणी करूनही टँकर मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याचे पडसाद सोमवारी महापालिकेच्या सभेत उमटले. कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसच्या सदस्यांनी ओसीडब्ल्यू विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रिकाम्या माठांसह सभागृहात प्रवेश क रीत हल्लाबोल आंदोलन केले. दोनवेळा कामकाज तहकूब केल्यानंतरही गोंधळ न शमल्याने तिसऱ्यांदा घाईगडबडीत विषय मंजूर करीत महापौर प्रवीण दटके यांनी सभा गुंडाळली.
दटके यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारून सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात करताच, पाणी द्या, पाणी द्या,ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करा, अशा घोषणा देत रिकामे माठ घेऊ न काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला. पाणी मिळत नसल्याने नागरिक नगरसेवकांच्या घरावर येतात. दुसरीकडे ओसीडब्ल्यू पुरेसे पाणी देत नसताना अधिक रकमेची बिले पाठवित आहेत. वाढीव रकमेची बिले न भरल्यास उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक त्रस्त असल्याचे विरोधीपक्षनेते विकास ठाकरे यांनी निदर्शनास आणले.
यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी महापौर व आयुक्तांना कल्पना दिली. परंतु कोणत्याही स्वरूपाच्या उपाययोजना केलेल्या नाही. वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नाही. सभागृहात अनेक विषयावर चर्चा होते. परंतु कारवाई मात्र शून्य असल्याने आधी पाण्याचा प्रश्न सोडवा नंतरच कामकाज होईल, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली. पाणी समस्येवर चर्चेतून मार्ग काढला जाईल. जो चुकेल त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन दटके यांनी दिले. परंतु यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनीही पाण्याच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा करण्याची तयारी दर्शविली. परंतु विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. गेल्या साडेचार वर्षांपासून नगरसेवकांच्या समस्या कायम आहेत. परंतु त्यावर कोणताही तोडगा निघत नाही. विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे बसपाचे किशोर गजभिये म्हणाले. या गोंधळात दटके यांनी विषय मंजूर केल्याचे जाहीर करून सभागृहाचे कामकाज संपल्याचे जाहीर केले. पाणीटंचाईवर कोणताही निर्णय जाहीर न केल्याने सदस्यांनी सभागृहात माठ फोडून रोष व्यक्त केला.
ओसीडब्ल्यू शहरातील नागरिक ांना पाणीपुरवठा करण्यात चुकत असेल तर कारवाई केली जाईल. कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या इन्टेक वेलसाठी ८ ते ११ एप्रिल दरम्यान पुरेसे कच्चे पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तीन-चार दिवस शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी झोननिहाय बैठका घेण्यात आल्या. टिल्लू पंप वापरणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. परंतु विरोधकांचा चर्चेवर विश्वास नाही. गोंधळ घालण्याच्या तयारीनेचे ते सभागृहात आले होते.
- प्रवीण दटके , महापौर
१५ दिवसांपूर्वी महापौरांना पाणी टंचाई ससंदर्भात निवेदन दिले. बील कमी करण्याची मागणी केली. नेटवर्क नसलेल्या भागातील लोकांना टँकर मिळत नाही. आश्वासन दिल्यानंतरही महापौर व आयुक्त याबाबत गंभीर नाही. ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करावे. चर्चा केल्यानंतर केबल डक्ट प्रकरणात कार्यकारी अभियंता संजय गायकवाड दोषी असतानाही आयुक्तांनी त्यांना क्लीनचिट दिली. महेश ट्रेडिंग कंपनी, स्टारबस प्रकरणात कारवाईचे निर्देश दिल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नाही. भ्रष्ट कंपन्यांना वाचविण्याचा प्रयत्न महापौर व आयुक्त करीत आहे. आमचे प्रश्न सुटले नाही तर यापुढे सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही.
विकास ठाकरे, विरोधी पक्षनेता, महापालिका