७०२ गावांत पाणीटंचाई
By Admin | Updated: February 5, 2015 01:08 IST2015-02-05T01:08:38+5:302015-02-05T01:08:38+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ७०२ गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपायोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर

७०२ गावांत पाणीटंचाई
जि. प. अध्यक्षांचे निर्देश : ११५६ उपाययोजना राबवा
नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ७०२ गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपायोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी बुधवारी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत दिले. टंचाईग्रस्त ७०२ गावांत ११५६ उपययोजना राबविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने सात कोटींचा आराखडा तयार केला आहे.
जिल्हा प्रशासनसाने तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे. यात २१८ नळ योजनांची दुरुस्ती, २४२ विंधन विहिरी, २८५ खासगी विहिरी अधिग्रहण, ४० टँकरव्दारे पाणीपुरवठा आदी कामांचा समावेश असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत हिंगणा तालुक्यातील वागधरा येथील योजनेवर १ कोटी ८ लाख, रामटेक तालुक्यातील पटगोवरी येथे ७० लाख तर काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथील योजनेवर ५७ लाखांचा खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली. मौदा तालुक्यातील पावजदवना येथील परमात्मा सेवक मंडळाची पाणी टाकी, तसेच मारोडी येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. गरज भासल्यास टंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.
जि.प.ने चार वर्षांपूर्वी १२ टिप्पर व ६ पोकलँन्ड खरेदी केले होते. परंतु ही यंत्रसामुग्री वापराविना पडून आहे. काही तालुक्यात राजकीय नेत्याकडून याचा वापर होत आहे. या यंत्रसामुग्रीचा वापर जिल्ह्यातील तलाव व बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. यातून सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याची माहिती सावरकर यांनी दिली. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, उकेश चव्हाण, सभापती आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे, दिपक गेडाम यांच्यासह पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)