पाणीटंचाईचा आराखडा २० कोटींवर
By Admin | Updated: April 23, 2015 02:28 IST2015-04-23T02:28:45+5:302015-04-23T02:28:45+5:30
पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ८१९ गावांचा समावेश करण्यात आला होता.

पाणीटंचाईचा आराखडा २० कोटींवर
नागपूर : पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ८१९ गावांचा समावेश करण्यात आला होता. परंतु उन्हाळ्यातील टंचाईची तीव्रता लक्षात घेता अतिरिक्त टंचाई आराखड्यात ७८२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या १६०१ पर्यंत पोहचली असून कृती आराखडा ७ कोटीवरून २० कोटींवर गेला आहे.
आॅक्टोबर २०१४ ते एप्रिल २०१५ संभाव्य टंचाईग्रस्त ८१९ गावांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ११५६ उपाययोजनांचा समावेश होता. परंतु मे व जून महिन्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या विचारात घेता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने १३ कोटींचा १८३१ उपाययोजनांचा अतिरिक्त आराखडा तयार केला आहे. जिल्हा प्रशासनाने या आराखड्याला मंजुरी दिली आहे.
अतिरक्त आराखड्यात १०५१ विंधन विहिरी, ५४३ विंधन विहिरींची दुरुस्ती, १२७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १० टँकरद्वारे पाणीपुरवठा, ४८ विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, ४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, आदी कामांचा समावेश यात आहे.
नवीन विंधन विहिरीसाठी ९.२३ कोटी, नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी १.२७ कोटी, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ७६ लाख व विहीर खोलीकरणासाठी ३८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जलस्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावातील लोकांना पाणी मिळावे, यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. आॅक्टोबर महिन्यात टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु मे व जून महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता विचारात घेता हा अतिरिक्त आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)