रेल्वे तिकिटापेक्षा महागले पाण्याचे दर

By Admin | Updated: March 23, 2015 02:23 IST2015-03-23T02:23:51+5:302015-03-23T02:23:51+5:30

रेल्वेत ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये आकारण्यात येतात. परंतु तेवढ्या पैशात मात्र प्रवाशांची साधी तहानही भागत नसल्याची स्थिती आहे.

Water rates are higher than railway tickets | रेल्वे तिकिटापेक्षा महागले पाण्याचे दर

रेल्वे तिकिटापेक्षा महागले पाण्याचे दर

नागपूर : रेल्वेत ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये आकारण्यात येतात. परंतु तेवढ्या पैशात मात्र प्रवाशांची साधी तहानही भागत नसल्याची स्थिती आहे. उन्हाळ्यात रेल्वेस्थानकावर थंड पिण्याचे पाणी मिळावे ही प्रवाशांची साधी मागणीही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे १५ ते २० रुपयाची पाण्याची बाटली खरेदी करताना प्रवाशी संताप व्यक्त करीत आहे.
प्रवाशांना शुध्द, गुणवत्तापूर्ण पाणी मिळावे याकरिता रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावर वॉटरकुलर बसविले. शहरातील देणगीदारांनीही वॉटरकुलर भेट दिले. या वॉटरकुलरवर प्रवाशांची तहान भागते. परंतु बाटलीबंद पाण्याची विक्री व्हावी म्हणून काही असामाजिक तत्त्व वॉटरकुलरच बंद ठेवत असल्याची माहिती आहे.
त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना थंड पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. याचा फायदा घेऊन अवैध व्हेंडर प्रवाशांना बाटलीबंद पाण्याची विक्री करीत आहेत. पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना १५ ते २० रुपये किंमत असलेले बाटलीबंद पाणी खरेदी करून तहान भागविण्याची पाळी आली आहे. असा प्रकार मागील वर्षी मे महिन्यात कळमना रेल्वेस्थानकावर उघडकीस आला होता.
खिशाला परवडणारा आणि सुरक्षेचा प्रवास म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. रेल्वेवर असलेल्या विश्वासामुळे भारतात दररोज दोन कोटी तीस लाख लोक प्रवास करतात. रेल्वेत १ ते १५ किलोमीटर प्रवासासाठी ५ रुपये, १६ ते ४० किलोमीटरसाठी १० रुपये आणि ४१ ते ६५ किलोमीटरसाठी १५ रुपये आकारण्यात येतात.
परंतु १५ ते २० रुपयाची पाण्याची बाटली खरेदी करावी लागत असल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना उन्हाळ्यात पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Water rates are higher than railway tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.