गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसनात ‘जलसंकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:41+5:302021-04-19T04:08:41+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : थकीत विद्युत देयकापाेटी महावितरणने पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे पुनर्वसन गावातील प्रकल्पग्रस्तांना पिण्याच्या ...

Water crisis in Gadeghat, Ghatumari rehabilitation | गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसनात ‘जलसंकट’

गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसनात ‘जलसंकट’

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : थकीत विद्युत देयकापाेटी महावितरणने पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे पुनर्वसन गावातील प्रकल्पग्रस्तांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये असंताेष व्यक्त हाेत आहे.

गाडेघाट, घाटउमरी असे या पुनर्वसित गट ग्रामपंचायतीचे नाव आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली ही गावे आणि शेतजमिनी बुडित क्षेत्रात गेल्याने तेथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन भिवापूरनजीकच्या तास कॉलनी परिसरात करण्यात आले. एक हजार लोकसंख्या असलेल्या या गट ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या दोन टाक्या आहेत. प्रकल्पग्रस्त येथे मुक्कामी असले तरी, उत्पन्नाचे कोणतेही प्रभावी साधन नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांकडून ग्रामपंचायतीच्या कराचा नियमित भरणा होत नाही. त्यामुळेच पुनर्वसनातील बहुतांश ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बेताची आहे.

अशातच पाणीपुरवठा याेजनेचे एक लाख ४० हजार रुपयांची विद्युत देयके थकित असल्यामुळे महावितरणने गत मार्च महिन्यात गाडेघाट, घाटउमरी ग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तेव्हापासून या दोन्ही गावात जलसंकट ओढवले आहे. तहान भागविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना दररोज परिसरातील विहिरींचा शोध घ्यावा लागतो. उन्हाळ्यात भूजल पातळी खोल गेलेल्या विहिरीतून पाणी ओढणे आणि नंतर घरापर्यंत पाेहचविणे या संपूर्ण प्रकारामुळे गावकऱ्यांचे बेहाल होत आहे. शासनाने किमान उन्हाळा आणि कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

..... ‌

बाेअरवेल्सचा सपाटा

एकीकडे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे काेराेना संक्रमणामुळे इतरांपासून दाेन हात लांब राहावे लागत आहे. यामुळे पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण हाेताे. ज्या कुटुंबांची आर्थिक स्थिती बरी आहे, अशांनी आठवडाभरात आपआपल्या घरी बाेअरवेल्सची सुविधा करून घेतली. मात्र बहुतांश प्रकल्पग्रस्तांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. आम्ही सिंचन प्रकल्पासाठी आपल्या शेतजमिनी, घरदार सर्व दिले. असे असताना आमच्यावर पाण्यासाठी दाराेदार भटकंती करण्याची वेळ आली आहे, अशी कैफियत राकेश गेडाम यांनी मांडली.

.....

पुनर्वसनातील ‘बत्ती गूल’

तालुक्यातील जवळपास १८ गावे गोसेखुर्द प्रकल्पात बुडित ठरली असून, बुडित गावांचे पुनर्वसन तालुक्यातील विविध भागात करण्यात आले. या पुनर्वसनात नागरी सुविधांचा अभाव व विविध मागण्यांवरून आजही काही प्रकल्पग्रस्त बुडित गावातच वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा यापूर्वीच खंडित करण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या थकीत विद्युत देयकावरून केवळ गाडेघाट, घाटउमरी ग्रामपंचायतीचाच वीजपुुरवठा खंडित केला नसून महावितरणने पांजरेपार (पुनर्वसन) ग्रामपंचायत वगळता इतर सर्वच पुनर्वसित ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य राेशन गायधने यांनी दिली. त्यामुळे या पुनर्वसित गावातही पाण्यासाठी पायपीटच सुरू आहे. सर्वत्र काेराेना संकट त्यात गावात पिण्याच्या पाण्याचे संकट अशा दुहेरी समस्येचा सामना प्रकल्पग्रस्तांना करावा लागत असल्याची बाबही राेशन गायधने यांनी व्यक्त केली.

Web Title: Water crisis in Gadeghat, Ghatumari rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.