भाजप नगरसेवकाला ‘पाणी बाधा’ !
By Admin | Updated: May 2, 2015 02:20 IST2015-05-02T02:20:05+5:302015-05-02T02:20:05+5:30
‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा योजना राबवून शहरातील नागरिकांना २४ तास शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा नागपूर महानगरपालिकेतर्फे केला जातो.

भाजप नगरसेवकाला ‘पाणी बाधा’ !
नागपूर : ‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा योजना राबवून शहरातील नागरिकांना २४ तास शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा नागपूर महानगरपालिकेतर्फे केला जातो. या योजनेबाबत देशभरात मोठा गवगवा करून स्वत:चीच पाठ थोपटून घेतली जाते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. नागरिकांना तर दूरच राहिले परंतु सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा शुद्ध पाणी मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवकच दूषित पिण्याच्या पाण्यामुळे आजारी पडले आहे. उलटी आणि हगवणीमुळे ते त्रस्त झाले असून यासाठी ते अधिकाऱ्यांना दोषी ठरवित आहेत.
दूषित पिण्याच्या पाण्यामुळे आजारी पडलेले ते नगरसेवक म्हणजे प्रदीप पोहाणे होत. पोहाणे हे भारतनगर प्रभागातील भाजपाचे नगरसेवक असून ते लकडगंज झोनचे सभापतीसुद्धा राहिले आहेत. जुना पारडी नाका येथील तिखिले हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत. लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आपल्या आजारासाठी अधिकाऱ्यांना दोषी ठरविले असून आजारातून बरा होताच अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.
शहरात सध्या प्रचंड उन्हात भीषम जलसंकट निर्माण झाले आहे. भारतनगर प्रभागही प्रभावित आहे. भारतनगरसह कळमना, पारडी आदी भागातही दूषित पाणी पुरवठा होत आहे.