लाखो लिटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:59+5:302021-03-13T04:14:59+5:30
रामटेक : शीतलवाडी-परसोडा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन १५ दिवसांपासून दोन ठिकाणी फुटली. यात लाखो लिटर ...

लाखो लिटर पाण्याची नासाडी
रामटेक : शीतलवाडी-परसोडा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन १५ दिवसांपासून दोन ठिकाणी फुटली. यात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. खिंडसी तलावातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाणीपुरवठा योजना शीतलवाडी-परसोडा ग्रामपंचायतीला सुरू झाली. सुरुवातीला ही योजना नगरधन येथे होती. नंतर ती शीतलवाडी-परसोडा ग्रामपंचायतला हस्तांतरित केली गेली. यासाठी खिंडसी येथून मुख्य पाईप लाईन टाकण्यात आली आहे. सध्या बारब्रीक कंपनीच्यावतीने मनसर ते तुमसर रोडचे बांधकाम सुरू आहे. पण, या कामात ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेकदा पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे पाणीपुरवठाही बाधित झाला होता. नुकतेच बस स्टँडजवळ पाईप लाईन फुटली होती. ती दुरुस्त करण्यात आली.
रामटेक बायपास रोडवर पहिल्या तलावाजवळ एका पुलाच्या खाली पाईप लाईन दोन ठिकाणी फुटली आहे. दोन्ही ठिकाणांवरून पाण्याचे फवारे उडत आहेत. पाणी नाल्याने वाहत आहे. १५ दिवसांपासून येथे पाण्याचा अपव्यय होत आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. त्यातच पाणीटंचाई भासणार आहे. अशावेळी ही फुटलेली पाईप लाईन दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.