यूपीच्या भामट्यांची धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:08 IST2021-02-16T04:08:41+5:302021-02-16T04:08:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पहाटेच्या वेळी किराणा दुकानात चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन भामट्यांना सतर्क नागरिकांनी पकडले आणि ...

यूपीच्या भामट्यांची धुलाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहाटेच्या वेळी किराणा दुकानात चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन भामट्यांना सतर्क नागरिकांनी पकडले आणि त्यांची बेदम धुलाई करून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे २च्या सुमारास ही घटना घडली. रामसखा बलराम पांडे (वय ३०) आणि समिंदर घनश्याम पांडे (वय २२, रा. लालगंज, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
ईश्वर हितचंद चंदिरमानी (वय ६०) यांचे क्वेट्टा कॉलनीत सद्गुरू किराणा स्टोअर्स आहे. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आरोपी रामसखा आणि समिंदरने शटर उचकटले. ते दुकानात चोरी करण्याच्या तयारीत असल्याचे या मार्गाने जाणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूच्यांना माहिती देऊन गोळा केले. चंदीरमानी यांना फोन करून बोलवून घेण्यात आले. त्यानंतर आरोपींना चोरीच्या प्रयत्नात असताना रंगेहात पकडून नागरिकांनी त्यांची धुलाई केली. लकडगंज पोलिसांना बोलवून या भामट्यांना त्यांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्यांनी यापूर्वी नागपुरात कुठे कुठे गुन्हे केले, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.
---