धो-धो बरसला
By Admin | Updated: October 11, 2016 03:30 IST2016-10-11T03:30:18+5:302016-10-11T03:30:18+5:30
उपराजधानीत सोमवारी दुपारी अचानक धो-धो वादळी पाऊस बरसला. या पावसाने दीक्षाभूमीसह संपूर्ण

धो-धो बरसला
नागपूर : उपराजधानीत सोमवारी दुपारी अचानक धो-धो वादळी पाऊस बरसला. या पावसाने दीक्षाभूमीसह संपूर्ण शहरात एकच तारांबळ उडाली. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने जाम लागला होता. विशेष म्हणजे, उद्या दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशभरातील लाखो बौद्घ बांधव येथे दाखल झाले असून, त्यांनाही या पावसाचा सामना करावा लागला. अवघ्या अर्धा तासात शहरात २२.६ मिमी. पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे, सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा मान्सून थांबतो. परंतु यंदा आॅक्टोबर महिन्यात सुद्धा तो सक्रिय दिसून येत आहे.
हवामान खात्याच्या मते, बंगालची खाडी व छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्यभारतात पावसाचा जोर वाढला. ११ आॅक्टोबरपर्यंत पावसाची अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. शिवाय दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली.
यानंतर तो साधारण अर्धा तास चांगलाच बरसला. याचवेळी विदर्भातील अन्य जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात सिरोंचा व गोंडपिपरी येथे ५० मिमी, भामरागड, कोरची, धानोरा व मूल येथे २०.२० मिमी व एटापल्ली, चामोर्शी, कोरपना, लाखनी आणि संग्रामपूर या भागात १०.१० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
बसस्थानकावर झाड पडले
अचानक आलेल्या वादळी पावसाने शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडली होती. यात विमानतळाशेजारी एक झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. यानंतर मनपाच्या उद्यान विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यावर मनपा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून रस्त्यावरील झाड हटविले. मात्र त्याचवेळी सिव्हिल लाईन्स परिसरातील जीपीओ चौक आणि वेस्ट हायकोर्ट रोडवरील एका बसस्थानकावर झाड पडल्याची घटना पुढे आली. यात बसस्थानकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सिव्हिल लाईन्स परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी एक झाड पडले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच या सर्व ठिकाणी पोहोचून झाडे रस्त्यांवरून हटविली.