वॉरंट जारी तरीही तपास अधिकारी ‘नदारद’

By Admin | Updated: August 30, 2014 02:48 IST2014-08-30T02:48:18+5:302014-08-30T02:48:18+5:30

अटकेचा वॉरंट जारी होऊनही तपास अधिकारी अखेरपर्यंत साक्ष देण्यास न्यायालयात अनुपस्थित राहिले.

Warrant issued despite investigation officer 'Nadad' | वॉरंट जारी तरीही तपास अधिकारी ‘नदारद’

वॉरंट जारी तरीही तपास अधिकारी ‘नदारद’

नागपूर : अटकेचा वॉरंट जारी होऊनही तपास अधिकारी अखेरपर्यंत साक्ष देण्यास न्यायालयात अनुपस्थित राहिले. परिणामी जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनी हल्ल्यातील आरोपीची निर्दोष सुटका झाली. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने दिला.
पप्पी ऊर्फ बलराम गंगाप्रसाद अत्तरवेल (२६), असे आरोपीचे नाव असून तो बेझनबाग सुदर्शन कॉलनी येथील रहिवासी आहे. मनीष कचरू मेंढे (३८), खुनी हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. या प्रकरणातील फिर्यादी जखमीचा भाऊ शेखर कचरू मेंढे रा. इंदोरा भंडार मोहल्ला हा आहे.
सरकार पक्षानुसार ‘मोबाईल’वरून २१ आॅक्टोबर २०१३ रोजी ही खुनी हल्ल्याची घटना घडली होती. मनीष हा घटनेच्या वेळी पेंटिंगची कामे करायचा. घटनेच्या दिवशी सकाळी तो आपला पुतण्या अक्षय याला सोबत घेऊन कामावर जात असताना त्यांना आरोपीने अडवले होते. काही दिवसांपूर्वी अक्षय याने पप्पीचा मोबाईल घेतला होता. परंतु तो त्याला परत करीत नव्हता. पप्पीने त्याला मोबाईल मागताच मनीष त्याला म्हणाला होता की, ‘अभी हम काम पर जा रहे है, बाद में देख लेना तेरा मोबाईल’ त्यामुळे पप्पी हा संतप्त होऊन मनीष आणि त्याच्यात बाचाबाची झाली होती. घटनेच्या दिवशी मनीष हा आपला भाऊ शेखर याच्या घरी आल्याचे समजताच पप्पीने शेखरच्या घरात घुसून धारदार व तीक्ष्ण चाकूने मनीषवर सहा घाव घालून गंभीररीत्या जखमी केले होते. शेखर मेंढे याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश खंडाते यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. साक्षीपुराव्यादरम्यान तपास अधिकारी न्यायालयात उपस्थित नव्हते. आधी समन्स आणि अटकेचा वॉरंट जारी होऊनही ते न्यायालयात उपस्थित झालेच नाहीत. न्यायालयात अन्य साक्षीदारांच्या साक्षीत तफावती आल्या. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी संशयाचा फायदा देऊन न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. पराग उके तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद पिंपळगावकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Warrant issued despite investigation officer 'Nadad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.