पारा चढतानाच विदर्भात पावसाचाही इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:25+5:302021-04-20T04:08:25+5:30
नागपूर : एकीकडे तापमानाचा पारा चढायला लागला असतानाच हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुन्हा तुरळक पावसाचाही इशारा दिला आहे. ...

पारा चढतानाच विदर्भात पावसाचाही इशारा
नागपूर : एकीकडे तापमानाचा पारा चढायला लागला असतानाच हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुन्हा तुरळक पावसाचाही इशारा दिला आहे. पुढील २१ ते २३ एप्रिल या काळासाठी हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मागील तीन दिवसापासूृन तापमानाचा पारा पुन्हा चढायला लागला आहे. सोमवारी नागपूर शहरातील तापमान ४०.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कालच्यापेक्षा तापमानात ०.६ अंशाने घट असली तरी दिवसाचे तापमान चांगलेच होते. सकाळी आर्द्रता ३२ टक्के तर सायंकाळी २३ टक्के नोंदविली गेली. सायंकाळनंतर वातावरणात किंचित फरक जाणवला असला तरी उकाडा मात्र कायम होता. विदर्भात चंद्रपुरातील तापमान सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यापाठोपाठ अकोला व यवतमाळात अनुक्रमे ४१.७ व ४१.९ अंश सेल्सिअस नोंद झाली. वर्धामध्ये ४१ अंश तर गडचिरोलीमध्ये ४१.२ अंश सेल्सिअस तापमान होते. अमरावती आणि गोंदियात सर्वात कमी म्हणजे ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, २१ ते २३ एप्रिल या काळात विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एक-दोन ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात आकाश काहीअंशी ढगाळलेले राहणार असल्याने तापमान पुन्हा खालावण्याची शक्यता आहे.