गोदाम कर्मचाऱ्यांना हवे कामाचे दाम

By Admin | Updated: September 21, 2015 03:22 IST2015-09-21T03:22:06+5:302015-09-21T03:22:06+5:30

अजबबंगल्याजवळ असलेल्या सरकारी गोदामाची तर दुरवस्था आहेच,..

Warehouse Employees Worth the Need | गोदाम कर्मचाऱ्यांना हवे कामाचे दाम

गोदाम कर्मचाऱ्यांना हवे कामाचे दाम

१७ वर्षांत पगारवाढ नाही : शौचालयाचीही सुुविधा नाही
लोकमत विशेष
नागपूर : अजबबंगल्याजवळ असलेल्या सरकारी गोदामाची तर दुरवस्था आहेच, पण या गोदामात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कामाचे दाम मिळेनासे झाले आहे. गेल्या १७ वर्षांत येथील कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली नाही. विशेष म्हणजे गोदाम परिसरात या कर्मचाऱ्यांना भोजनासाठी स्वतंत्र कक्ष नाही, महिलांसाठी शौचालयाचीही सोय नाही. मूत्रीघर आहे पण त्याचेही दरवाजे तुटले आहेत. अत्यंत वाईट परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.
अजबबंगला, कॉटन मार्केट व .... या तीन गोदामात एकूण १३५ कर्मचारी काम करतात. १९७५ मध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, जिल्हाधिकारी व कर्मचारी युनियनमध्ये करार झाला व कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले. मात्र, १९९८ पासून या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती (पे फिक्सेशन) झालेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांची डीए वाढही बंद करण्यात आली आहे. १९९० पासून येथे कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही.
फक्त अनुकंपा तत्त्वावर अधूनमधून पदे भरली जातात. तिन्ही सरकारी गोदामांमध्ये एकूण तीन मोकदम हवेत, मात्र फक्त एक आहे. टोळीप्रमुख १२ हवेत, मात्र ८ कार्यरत आहेत.
प्रत्येक टोळीत १४ लोडर हवेत, प्रत्यक्षात ८ ते ९ लोडर असून त्यांना अतिरिक्त वेळ देऊन काम करावे लागत आहे. (प्रतिनिधी)

गणवेशासाठी वार्षिक १५६ रुपये!
राज्य सरकार प्रत्येक बाबीचा ठराविक वर्षांनी आढावा घेते व सुधारित दर लागू करते. या गोदामातील कर्मचाऱ्यांना मात्र गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी एक गणवेश घेण्यासाठी फक्त १५६ रुपये दिले जातात. महागाईच्या काळात १५६ रुपयात एक शर्ट तरी येतो का, यावर पुरवठा विभागानेही कधी विचार केलेला दिसत नाही. कामगारांना दरमहा फक्त ७५ रुपये वैद्यकीय भत्ता दिला जातो. शासनातर्फे होत असलेली ही थट्टा नागपूरचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी थांबवावी, अशी मागणी कामगार- कर्मचाऱ्यांनी केली आहे.

स्वातंत्र्यदिन व गणराज्यदिनाचीही सुटी नाही
देशाचा स्वातंत्र्यदिन व गणराज्यदिन साजरा करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. या दिवशी जवळपास सर्वच आस्थापना आपले कर्मचारी व कामगारांना सुटी देतात. मात्र, या शासकीय गोदामात काम करणाऱ्या कर्मचारी- कामगारांना या राष्ट्रीय सणांनाही सुटी दिली जात नाही. या कर्मचाऱ्यांना वर्षाला १३ सुट्या दिल्या जातात. कुणी १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीला सुटी घेतली तर १३ सुट्यांमधून या सुट्यांची कपात केली जाते. यावर कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना नाराजी व्यक्त केली.

आम्ही संप करीत नाही
ही आमची चूक का?

कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यावर नाराजी व्यक्त केली. आम्हाला घरसंसार आहे. मुलाबाळांचे शिक्षण करायचे आहे. १७ वर्षांपासून पगारवाढ मिळत नसेल तर हा कुठला न्याय समजायचा. आजवर आम्ही एकदाही संप केलेला नाही. आम्ही एक आठवडा संप पुकारला तरी रेशन दुकानात धान्य पोहोचणार नाही. सरकार झटक्यात जागे होईल. पण आम्ही सामंजस्याने घेतो, संप करीत नाही ही आमची चूक आहे का, असा सवाल गोदाम कर्मचाऱ्यांनी सरकारला केला आहे.

शासनाचे लक्ष वेधणार
अजबबंगल्याजवळील शासकीय गोदामाची स्थिती पाहून आपल्याला धक्काच बसला. नागपूरकरांना रेशनमार्फत पुरवठा केले जाणारे धान्य एवढ्या वाईट परिस्थितीत ठेवले जाते, हे धक्कादायक आहे. येथील कर्मचाऱ्यांनाही सुविधा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पगारवाढ नाही. शौचालयासारख्या मूलभूत सुविधाही नाहीत. प्रशासनाचेही या गोदामाच्या एकूणच व्यवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. संबंधित प्रश्नावर पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी, वखार महामंडळ व गोदामात काम करणारे कर्मचारी यांची संयुक्त बैठक लावली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल; तसेच विधान परिषदेतही प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले जाईल.
- अनिल सोले, विधान परिषद सदस्य

४० वर्षांनंतर केली लोकप्रतिनिधीने पाहणी!
आ. अनिल सोले यांनी नुकतीच या गोदामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनाही गोदामाची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले. गोदामात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोले यांना साकडे घालत गोदामाची दुरुस्ती करण्याची तसेच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. विशेष म्हणजे तब्बल ४० वर्षांनंतर एखादा लोकप्रतिनिधी या गोदामाची पाहणी करण्यासाठी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आले, हे पाहून बरे वाटले, अशा शब्दात कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सोले यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. आजवर लोकप्रतिनिधींनी या गोदामाकडे केलेले दुर्लक्ष व आ. अनिल सोले यांनी एका फोनवर घेतलेली दखल यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.

Web Title: Warehouse Employees Worth the Need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.