२० वर्षांनंतर पुन्हा तीनचा प्रभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST2021-09-23T04:10:06+5:302021-09-23T04:10:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा २०२२ मध्ये होऊ घातलेली नागपूर महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय प्रभाग ...

२० वर्षांनंतर पुन्हा तीनचा प्रभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा २०२२ मध्ये होऊ घातलेली नागपूर महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल. २००२ मध्ये तीनसदस्यीय प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली होती. पण, नागरिकांना विकासकामांबाबत आलेले अनुभव चांगले नव्हते. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीतही नागपूरकरांनी असेच अनुभव घेतले. नगरसेवक एकमेकांवर विषय ढकलतात. जबाबदारी निश्चित होत नाही. एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीमुळे या कटकटीतून नागरिकांची सुटका होईल, अशी आशा होती. मात्र, राज्य सरकारने तीनसदस्यीय प्रभाग केल्याने याचा विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
२००२ मध्ये नागपुरात तीनसदस्यीय प्रभाग पद्धती होती. त्यावेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत उमेदवार व मतदारांसाठीही नवी होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यातील सत्तेचा फायदा झाला. काँग्रेसला सर्वाधिक ५१ जागा मिळाल्या. भाजपला ४७, राष्ट्रवादी काँग्रेसला ९, शिवसेना ६, बसपा ९ तर १२ अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. मनपात काँग्रेस-राष्ट्रवादी व बसपाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. तीनसदस्यीय पद्धतीमुळे नागरिकांची निराशा झाली. २००७ मध्ये एकसदस्यीय वॉर्ड होताच काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला. भाजपने बाजी मारून सत्ता काबीज केली. त्यानंतर २०१२ मध्ये दोनसदस्यीय प्रभाग, तर २०१७ सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आली. २००७ पासून मनपात भाजपची सत्ता कायम आहे.
राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना २०१७ मध्ये चारसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय बदलून तीनसदस्यीय प्रभागाची घोषणा करण्यात आली. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित राहत नाही. लहानसहान कामांसाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. यामुळे या निर्णयावर सामान्य नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
....
वॉर्डाची पुनर्रचना करावी लागणार
- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीची पुनर्रचना करण्याला सुरुवात केली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका होणार असल्याने प्रशासनाला पुन्हा त्यानुसार प्रभागरचना करावी लागणार आहे.
...
अशी बदलली प्रभागरचना
वर्ष - प्रभागपद्धती
२००२- तीनसदस्यीय प्रभाग
२००७- एकसदस्यीय वॉर्ड
२०१२ - दोनसदस्यीय प्रभाग
२०१७ - चारसदस्यीय प्रभाग
२०१९ - हिवाळी अधिवेशनात एकसदस्यीय प्रभाग जाहीर
२०२१ - तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
...
तीन निवडणुकांत १५ जागा वाढल्या
लोकसंख्यावाढीसोबतच नगरसेवकांची संख्या वाढल्याने वाॅर्डांची रचना वेळोवेळी बदलण्यात आली. २००७ मध्ये महापालिकेत १३६ नगरसेवक होते. २०१२ मध्ये १४५ होते. तर २०१७ च्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या १५१ झाली. २०२२ च्या निवडणुकीत पुन्हा नगरसेवकांची संख्या १५ ने वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मनपात १६६ नगरसेवक राहतील.