वारा जहाँगीर येथील जवानाच्या शौर्याला मरणोपरांत उजाळा
By Admin | Updated: September 3, 2014 00:47 IST2014-09-03T00:44:29+5:302014-09-03T00:47:37+5:30
नागपुरस्थित सैन्यदलाच्या ११८ प्रादेशिक छावणी रस्त्याला वीर योगीराज नागुलकर एस.एस. मार्ग असे नामकरण

वारा जहाँगीर येथील जवानाच्या शौर्याला मरणोपरांत उजाळा
वाशिम : भारतीय सैन्यदलात १७ वर्षाची सेवा दिलेल्या वाशिम तालुक्यातील वारा जहाँगीर येथील योगीराज नागुलकर यांनी कर्तव्य बजावताना केलेले शौर्य त्यांच्या मृत्यूच्या १५ वर्षानंतर सैन्याने त्यांच्या केलेल्या गौरवाने उजागर झाले आहे.
सैन्याच्या ११८ प्रादेशिक तुकडीच्या हिरक महोत्सवदिनी नागपूर येथे त्यांच्या कीर्तीस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. नागपुरस्थित सैन्य दलाच्या ११८ प्रादेशिक छावणीकडे जाणार्या रस्त्याला वीर हवालदार योगीराज नागुलकर एस.एस. मार्ग असे नाव देण्यात आले आहे. वाशिम तालुक्यातील वारा जहांगीरचे रहिवासी असलेले योगीराज मोतीराम नागुलकर हे देशसेवेचे व्रत घेवून ११८ प्रादेशिक सेनेच्या तुकडीत १९८२ मध्ये भरती झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना प्रथम नाईक व नंतर हवालदार पदावर बढती देण्यात आली होती. १९९१ मध्ये देहूरोड येथून बंगालमध्ये दारुगोळा नेण्यासाठी सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी ११८ प्रादेशिक सेनेच्या डी तुकडीवर सोपविण्यात आली होती. या गाडीवर वाटेत गाडी लुटण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी हल्ला करुन ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तुकडीत कार्यरत असलेल्या योगीराज नागुलकरांनी माओवाद्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे शौर्य दाखविले होते. त्यांच्या शौर्याची दखल घेवून तत्कालीन राष्ट्रपती डॉ.शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते योगीराज नागुलकर यांना सेना पदक प्रदान करण्यात आले होते. १८ प्रादेशिक सेनेला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण झाले. २१ ते १३ ऑगस्टदरम्यान नागपुरात पार पडलेल्या हिरक महोत्सवात ११८ प्रादेशिक सेनेच्या पाच कीर्तीस्थळाचे उद्घाटन दिल्लीचे मीलट्री सेकेट्ररी लेफ्टनंट जनरल शक्ती ब्रींग यांच्या हस्ते करण्यात आले. या कीर्तीस्थळामध्ये हवालदार योगीराज नागुलकर यांचे नाव दिलेल्या छावणीकडे जाणार्या रस्त्याच्या नावाचाही समावेश आहे. या कार्यक्रमात स्व. योगीराज नागुलकर यांच्या पत्नी मिराबाई नागुलकर यांना १0 हजार रोख, शाल, श्रीफळ देवून सन्मानीतही करण्यात आले. या कार्यक्रमाला योगीराज नागुलकर यांचा मुलगा अरुण, राम तसेच सुन भाग्यश्री नागुलकर यांच्यासह जिल्हय़ातील माजी सैनिक साईदास वानखेडे, एकाडे, इंगोले, सोनोने यांची उपस्थिती होती. योगीराज नागुलकर यांनी केलेले कार्य त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल १५ वर्षानी ११८ प्रादेशिक सनेने केलेल्या त्यांच्या गौरवामुळे सर्वांसमोर आले आहे. त्यांच्या कार्याने वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.