मुंबईतील वॉन्टेड शूटर अटकेत
By Admin | Updated: December 12, 2015 05:33 IST2015-12-12T05:33:18+5:302015-12-12T05:33:18+5:30
गुन्हेशाखेच्या पथकाने मोमिनपुऱ्यातील एका गेस्टहाऊसमध्ये शुक्रवारी पहाटे एक विशेष आॅपरेशन राबवून मुंबईतील

मुंबईतील वॉन्टेड शूटर अटकेत
गुन्हेशाखेचे मोमिनपुऱ्यातील गेस्ट हाऊसमध्ये आॅपरेशन : पिस्तूल, रोकड, सोने जप्त
नागपूर : गुन्हेशाखेच्या पथकाने मोमिनपुऱ्यातील एका गेस्टहाऊसमध्ये शुक्रवारी पहाटे एक विशेष आॅपरेशन राबवून मुंबईतील तीन ‘वॉन्टेड शूटर’ पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतूस, सुरा, दीड लाखाची रोकड, सोने आणि अन्य चीजवस्तूंसह सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद शोएब शौकत अली मंसूर (नल बाजार मुंबई), राहुल रमेश पवार (भरतवाडा, मालेगाव) आणि संजयकुमार महंती (नालासोपारा) अशी या तिघांची नावे आहेत. ते अंडरवर्ल्डशी किंवा मुंबईतील कुण्या डॉनशी संबंधित आहेत काय, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
या तिघांनी दक्षेस कांतीलाल शहा नामक व्यापाऱ्यावर ५ नोव्हेंबरला फायरिंग करून रक्कम लुटली होती. ही रक्कम हवालाची असल्याची टीप मिळाल्याने आरोपींनी शहाकडून रोकड असलेली बॅग हिसकावण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. अंधेरी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तिघांची ओळख पटविल्यानंतर मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत होते. राज्यभरातील पोलिसांना मुंबई पोलिसांनी या तिघांची माहिती देऊन त्यांना ‘वॉन्टेड‘ घोषित केले होते. हे तिघे नागपुरात दडून बसल्याची माहिती कळल्यानंतर एपीआय दहीफळे यांच्या नेतृत्वात अंधेरी पोलिसांचे एक पथक नागपुरात आले. गुरुवारी रात्री त्यांनी स्थानिक वरिष्ठांची भेट घेऊन या फरार आरोपींबाबत माहिती दिली. त्यावरून पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन आणि अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पथक या तिघांचा मोमिनपुऱ्यात रात्रभर शोध घेत होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर सेलचे तज्ज्ञांनी पहाटे २ वाजता आरोपींचे ‘लोकेशन ट्रेस’ केले. ते मोमिनपुऱ्यातील अल कदिर गेस्ट हाऊसमध्ये असल्याची खात्री पटताच गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल कातकडे, चंद्रशेखर ढोले, महल्ले, सहायक निरीक्षक अतुलकर, सचिन लुले यांनी मोठा पोलीस ताफा घेऊन शुक्रवारी पहाटे गेस्टहाऊसला गराडा घातला. हे तिघेही खतरनाक गुन्हेगार असल्याचे लक्षात घेता पोलिसांनीही तयारीनिशी ‘आॅपरेशन’ सुरू केले.