नगरधन येथे हवी पोलीस चौकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:27+5:302021-02-06T04:13:27+5:30
रामटेक : रामटेक तालुक्यातील नगरधन प्राचीण नंदीवर्धन किल्ल्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. कोरोना काळात ...

नगरधन येथे हवी पोलीस चौकी
रामटेक : रामटेक तालुक्यातील नगरधन प्राचीण नंदीवर्धन किल्ल्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. कोरोना काळात किल्ला बंद असल्याने येथे बाहेरच्यांची गर्दी नव्हती. आता मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्याने रामटेक परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. इकडे गत दशकभरात नगरधन गावाची लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्या आहेत. येथे प्राचीन नंदीवर्धन किल्ल्यासोबतच राईस मिल, ऑइल मिल, सूर्यालक्ष्मी कॉटन मिल असून, नवीन कंपनी निर्मितीचे कार्यही सुरू आहे. तेथे मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार काम करतात. राईस मिल व कंपनीच्या बाजूला ट्रॅक ट्रॅक्टरची मोठी रांग असते. त्यामुळे वाहन चालविताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. आजूबाजूला लॉज व हॉटेलचाही व्यवसाय बहरत आहे. गावात मोठी बाजारपेठ असून, सर्वस्तरीय लोकांचा नियमित वावर या ठिकाणी असतो. येथे बरेचदा लहान-मोठ्या प्रसंगावरून वादावादी झाली असून, त्याचे मोठ्या झगड्यात रूपांतरही झाले आहे. त्याही वेळी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवूनच परिस्थिती नियंत्रणात आणल्या गेली आहे. नगरधन येथील लोकसंख्या दहा हजारांच्या वर आहे. यासोबतच आजूबाजूच्या गावाचीही लोकसंख्या तीन ते पाच हजारांच्या वर आहे. गावात व परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध कामे होऊ नये आणि कायद्याचा वचक राहावा यासाठी पोलीस चौकी निर्माण होणे गरजेचे झाले आहे. यापूर्वी पोलीस चौकी निर्मितीचे प्रयत्न केल्या गेले. मात्र चौकीसाठी जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आता नव्याने या परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणीने जोर धरला आहे.