मेंदू आजाराच्या जनजागृतीसाठी वॉकथॉन
By Admin | Updated: July 23, 2014 00:56 IST2014-07-23T00:56:05+5:302014-07-23T00:56:05+5:30
आपली शेकडो कामे मेंदू बिनबोभाट करीत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते, इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपण इतर अवयवांची किंवा चेहरा व पेहराव

मेंदू आजाराच्या जनजागृतीसाठी वॉकथॉन
इंडियन अकादमी आॅफ न्यूरोलॉजीतर्फे : मेंदू आजार जागृती सप्ताह
नागपूर : आपली शेकडो कामे मेंदू बिनबोभाट करीत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते, इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपण इतर अवयवांची किंवा चेहरा व पेहराव यांची जेवढी काळजी घेतो, त्यापेक्षा मेंदूची अधिक काळजी घ्यायला हवी, असे आवाहन जागतिक मेंदू दिनाच्यानिमित्ताने ‘वॉकथॉनच्या’ माध्यमातून मंगळवारी करण्यात आले.
इंडियन अकादमी आॅफ न्यूरोलॉजी, नागपूर न्यूरो सोसायटी, इंडियन सायकॅट्रिक सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेस, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि बसोली ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मेंदू दिनानिमित्त जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या पहिल्या दिवशी पंचशील चौकातील टिळक पत्रकार भवन येथून ही ‘वॉकथॉन’ प्रारंभ झाली. संततधार पावसातही शहरातील प्रसिद्ध डॉक्टर, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी हिरवी झेंडी दिली. वॉकथान रॅली टिळक पत्रकार भवन- पंचशील चौक, झाशी राणी चौक-व्हेरायटी चौकातून परत झाशी राणी चौक- पंचशील चौकमार्गे टिळक पत्रकार भवनात आली. येथे रॅलीचा समारोप झाला.
वॉकथॉनमध्ये सहभागी सर्वांच्या हातात मेंदू आजाराबद्दल जागृती करणारे फलक होते. प्रत्येकाने जागतिक मेंदू दिन लिहिलेला पांढरा ‘टी शर्ट’ आणि ‘कॅप’ परिधान केली होती. इंडियन अकादमी आॅफ न्यूरॉलॉजीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या नेतृत्वात ही रॅली निघाली.
यावेळी न्यूरोसर्जन लोकेन्द्र सिंग, रेडिओ-न्यूरोलॉजिस्ट डॉ. राजू खंडेलवाल, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, डॉ. सुनील गुप्ता, डॉ. प्रफुल्ल शेवाळकर, डॉ. संजय रामटेके, डॉ. अविनाश जोशी, डॉ. सुहास कानफाडे, डॉ. संग्राम वाघ, डॉ. प्रदीप वराडकर, डॉ. खुश झुनझुनवाला, डॉ. पौर्णिमा करंदीकर, डॉ. नितीन चांडक, डॉ. आर.बी. कळमकर, डॉ. अभिषेक सोमानी यांच्यासह धीरन कन्या विद्यालय व मदन गोपाल शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)