तीन हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ !
By Admin | Updated: September 5, 2014 01:48 IST2014-09-05T00:27:05+5:302014-09-05T01:48:22+5:30
टंचाईसदृश १२३ तालुक्यांमध्ये मोताळा तालुक्याचा समावेश; तीन हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ.

तीन हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ !
मोताळा : शासनाने सरासरीपेक्षा ५0 टक्क्यांहून कमी पाऊस पडलेल्या राज्यातील १२३ तालुक्यांमध्ये टंचाईसदृश जाहीर आली आहे. टंचाईसदृश १२३ तालुक्यांमध्ये मोताळा तालुक्याचा समावेश आहे. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ केले जाणार आहे. याचा तालुक्यातील ३६८८ विद्यार्थ्यांंना लाभ मिळणार आहे.
ऑगस्ट महिना संपण्याच्या मार्गावर असून, अद्यापपावेतो तालुक्यात एकदाही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मागील काही वर्षांपासून मोताळा तालुक्याला कमी-अधिक प्रमाणात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
ही बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यामध्ये टंचाईसदृश स्थिती जाहीर केल्यामुळे या तालुक्यातील शेतकर्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे. कृषी पंपाच्या वीज बिलामध्ये ३३ टक्के सवलत मिळणार असून, शेतसाराही माफ केला जाणार आहे. त्याचप्रमाणे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्कही माफ करण्यात आले आहे. तालुकाभरातील २९ माध्यमिक विद्यालय व १६ ज्यूनियर कनिष्ठ महाविद्यालयातील ३६८८ विद्यार्थ्यांंना याचा फायदा होणार आहे.
** दहावीला आठ लाख माफ
तालुक्यामध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांंची संख्या २३९९ इतकी तर बारावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांंची संख्या १२८९ इतकी आहे. दहावीच्या परीक्षेसाठी प्रति विद्यार्थी ३४0 रूपये इतके परीक्षा शुल्क आकारले जाते. शासनाच्या या निर्णयामुळे तब्बल ८लाख १५ हजार ६६0 रूपये इतके शुल्क माफ होणार आहे.
** १२ वी ला ४ लाख माफ
बारावीच्या वर्गामध्येही या तालुक्यातील १२८९ विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांंना चारशे रूपये तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांंना ३६0 रूपये परीक्षा शुल्क आकारले जाते. त्यामुळे याही विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्काचे तब्बल ४ लाख ७0 हजार ४८५ रूपये माफ होणार आहेत.