लसीकरणामुळे रक्तदात्याला दोन महिन्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:31+5:302021-03-13T04:13:31+5:30
सुमेध वाघमारे नागपूर: कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांना पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. राष्ट्रीय रक्त संक्रमण ...

लसीकरणामुळे रक्तदात्याला दोन महिन्यांची प्रतीक्षा
सुमेध वाघमारे
नागपूर: कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांना पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या (एनबीटीसी) नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करण्याला बंदी घातली आहे. रक्तदात्याला रक्तदानासाठी जवळपास दोन महिने थांबावे लागणार आहे. परिणामी, रक्ताच्या टंचाईत भर पडण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आधीच वर्षभरापासून रक्ताच्या टंचाईला तोंड देत असलेल्या रक्तपेढ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच, मार्च २०२० पासून शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा-कॉलेज बंद केल्या. मेळावे, कार्यक्रमांवरही निर्बंध घातले. यामुळे रक्तदान शिबिरांच्या संख्येत कमालीची घट आली. काही रक्तदात्यांमध्ये कोरोनाची भीती व संभ्रम निर्माण झाल्याने स्वेच्छा रक्तदानही कमी झाले. यातच गंभीर कोरोनाबाधितांच्या रुग्णांकडून प्लाझ्माची मागणी वाढली. अपुऱ्या रक्तसाठ्यामुळे शासकीयसह खासगी रक्तपेढ्या अडचणीत आल्या. अति गंभीर रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांना रक्त पुरवठा करण्याची वेळ आली. ‘एनबीटीसी’ने यासंदर्भात, रक्तदात्यांची कोरोना विषाणूबाबतची लक्षणे व प्रवासाचा इतिहास तपासून आणि सुरक्षा, स्वच्छतेचे पालन करून तसेच रक्तदानाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थित नियमन करून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याविषयी सूचना जारी केल्या. शासनाला पुढे येऊन रक्तदान करण्यासाठी आवाहन करावे लागले. याचदरम्यान नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने रक्ताची टंचाई कमी होऊ लागली होती; परंतु फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाबाधितांमध्ये वाढ होऊ लागली. मागील दोन आठवड्यांपासून शनिवार व रविवारी गर्दीच्या स्थळांवर बंदी आणण्यात आली. यातच १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आल्याने याचा परिणाम रक्तदानावर होणार आहे. या समस्येवर रक्तपेढ्या उपाय शोधत असताना ‘एनबीटीसी’ने ५ मार्च रोजी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यामुळे येत्या काळात रक्ताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता बोलली जात आहे.
-‘बुस्टर’ डोसनंतर २८ दिवसांनी रक्तदान
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यात ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ वर्कर’ तर दुसऱ्या टप्प्यातील ‘फ्रंट लाइन वर्कर’ना लस दिली जात आहे. रुग्णालयातील आपत्कालीन स्थितीत हेच ‘वर्कर’ पुढाकार घेऊन गरजूंना रक्तदान करतात. ‘एनबीटीसी’च्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, ‘बुस्टर’ डोस घेतल्यानंतर रक्तदानासाठी २८ दिवस थांबावे लागणार आहे .
-वेळेवर रक्तपुरवठा करण्यावर रक्तपेढ्याच साशंक
उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या शासकीयसह जवळपास ६३३ वर खासगी रुग्णालये आहेत. विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्यप्रदेशातून, तेलंगाणा येथून नागपुरात रुग्ण येतो. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळांतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत; परंतु नव्या सूचनेनुसार रक्तपेढ्यांना रक्त मिळणे कठीण होणार आहे. यामुळे रुग्णाला वेळेवर रक्तपुरवठा होऊ शकणार का, याबाबत रक्तपेढ्या साशंक आहेत.
-लसीकरणापूर्वी रक्तदान करा
कोरोनामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठी घट आली आहे. दरम्यानच्या काळात रक्तदान मोहीम रुळावर येत असताना पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. परिणामी, लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. यातच ‘एनबीटीसी’च्या नव्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांना साधारण दोन महिने रक्तदान करता येणार नाही. यामुळे रक्ताची टंचाई जाणविण्याची शक्यता आहे. रक्तदात्यांनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे. असे झाल्यास गरजू रुग्ण अडचणीत येणार नाहीत.
-प्रवीण पाटील
जनसंपर्क अधिकारी, हेडगेवार रक्तपेढी.