‘डायल ए मील’ योजनेची प्रवाशांना प्रतीक्षा
By Admin | Updated: July 22, 2014 00:56 IST2014-07-22T00:56:45+5:302014-07-22T00:56:45+5:30
रेल्वे प्रवासादरम्यान परवडणाऱ्या किमतीमध्ये उत्तम नाश्ता व भोजन उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘डायल ए मील’ योजनेची घोषणा केली आहे. परंतु रेल्वे प्रवाशांना या योजनेची अजूनही प्रतीक्षा आहे.

‘डायल ए मील’ योजनेची प्रवाशांना प्रतीक्षा
रेल्वे बोर्ड : स्टेशनांची यादी तयार करण्याचे काम सुरू
नागपूर : रेल्वे प्रवासादरम्यान परवडणाऱ्या किमतीमध्ये उत्तम नाश्ता व भोजन उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘डायल ए मील’ योजनेची घोषणा केली आहे. परंतु रेल्वे प्रवाशांना या योजनेची अजूनही प्रतीक्षा आहे. काही खासगी आॅपरेटर्सद्वारा नाश्ता व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह लावले आहे.
मध्य रेल्वे झोन मुख्यालयाचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आर.डी. शर्मा (मुंबई) यांनी स्पष्ट केले की, यावर्षी रेल्वे बजेटमध्ये ‘डायल ए मील’ योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु अजून योजना सुरू झालेली नाही. ही योजना लागू करण्यासाठी रेल्वे बोर्ड रेल्वे स्टेशनची यादी तयार करीत आहे. आयआरसीटीसीचे अध्यक्ष सहव्यवस्थापकीय निदेशक एम.पी. मल (दिल्ली) यांनी सांगितले की, डायल ए मील योजना आयआरसीटीसीऐवजी भारतीय रेल्वेतर्फे लागू केली जाणार आहे. योजना अजून सुरू झालेली नाही. काही खासगी आॅपरेटर प्रवाशांना अवैधपणे भोजन उपलब्ध करीत आहेत.
मध्य रेल्वे नागपूरचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर आणि खानपानचा कार्यभार सांभाळणारे वाणिज्य व्यवस्थापक बी.एल. कोरी यांनीसुद्धा हीच बाब स्पष्ट केली. डॉ. देऊळकर यांनी सांगितले की, योजना सुरू करण्यासाठी अजूनपर्यंत अधिकृतपणे कुठलेही आदेश आलेले नाहीत. कुठल्याही परवानगीशिवाय खासगी आॅपरेटर रेल्वे स्टेशनवर रेल्वेमध्ये भोजन व नाश्ता विकू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतरही खासगी आॅपरेटरद्वारा योजनेच्या नावावर अनधिकृतपणे रेल्वेमध्ये भोजन उपलब्ध केले जात असल्याची माहिती मिळालेली आहे. संबंधित आॅपरेटरचा शोध घेतला जात आहे. रेल्वे प्रशासनातर्फे कुठलेही तर्क दिले जात असले तरी, रेल्वे प्रवाशांना योजनेची प्रतीक्षा असून लवकरच ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)