तीन वर्षांपासून विद्यार्थी पदवीच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: March 28, 2015 01:50 IST2015-03-28T01:50:46+5:302015-03-28T01:50:46+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेंट अ‍ॅ़न्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल)

Waiting for a student degree for three years | तीन वर्षांपासून विद्यार्थी पदवीच्या प्रतीक्षेत

तीन वर्षांपासून विद्यार्थी पदवीच्या प्रतीक्षेत

नागपूर विद्यापीठ : हाच आहे का ‘अ’ दर्जा ?
नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेंट अ‍ॅ़न्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) ‘अ’ दर्जा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अद्यापही भोंगळ कारभारच सुरू असल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाने २०१२ सालापासून विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिलेच नसून यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्याची माहिती असूनदेखील विद्यापीठाने कुठलीही तातडीची पावले उचलण्याचे कष्ट घेतले नाही.
शुक्रवारी झालेल्या विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ होऊन महिना उलटून गेला असतानादेखील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र का मिळाले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पदवी प्रमाणपत्र नसल्याने अनेकांच्या नोकरी संकटात आल्या आहेत. विशेषत: विदेशातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या ठिकाणी पदवी प्रमाणपत्राची मागणी होती. दीक्षांत समारंभ झाल्यावरदेखील पदवी कशी मिळत नाही अशा प्रश्न उपस्थित करुन विद्यार्थ्यांवरच संशय घेण्यात येतो, असे बाजपेयी म्हणाले. यावर चर्चा सुरू असताना २०१३ सोबतच २०१२ च्या विद्यार्थ्यांना म्हणजेच १०० व्या दीक्षांत समारंभातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या हाती पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे प्रशासनाने मान्य केले. २०१२ साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचे काम पूर्ण झाले असून त्यांचे वितरण करण्यात येईल अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी दिली. (प्रतिनिधी)

विद्यापीठ घेणार निवृत्त अधिकाऱ्यांची सेवा
विद्यापीठात कर्मचारी व अधिकाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रांच्या कामाला फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिदिवस मानधन तत्त्वावर सेवा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यानुसार १२ जणांची नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली.
आकड्यांबाबतदेखील घोळ
विद्यापीठाने दिलेल्या छापील उत्तरात २०१३ च्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. १०१ व्या दीक्षांत समारंभात ६८ हजार ७७१ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली असून त्यापैकी आचार्य पदवीच्या केवळ १६६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु पुढील उत्तरात हाच आकडा ६८ हजार ६०५ इतका सांगण्यात आला. त्यामुळे नेमका आकडा किती यावरुन अ‍ॅड.बाजपेयी यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

Web Title: Waiting for a student degree for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.