प्रतीक्षा आषाढमेघांची...
By Admin | Updated: July 17, 2015 03:16 IST2015-07-17T03:16:05+5:302015-07-17T03:16:05+5:30
‘आषाढस्य प्रथम दिवसे’, अर्थात महाकवी कालिदासांचा स्मृती दिन! महाकवींनी रामटेकच्या रामगिरीवर बसून ...
_ns.jpg)
प्रतीक्षा आषाढमेघांची...
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ : महाकवी कालिदासांचा स्मृतिदिन, स्मारकाची दुरवस्था
दीपक गिरधर रामटेक
‘आषाढस्य प्रथम दिवसे’, अर्थात महाकवी कालिदासांचा स्मृती दिन! महाकवींनी रामटेकच्या रामगिरीवर बसून आपल्या विरहदग्ध प्रेयसीला मेघांमार्फत संदेश पाठविणारं अजरामर महाकाव्य ‘मेघदूत’ लिहिले. रामगिरी हे महाकवींच्या वास्तव्याने पावन झाले. कालिदास स्वत: पत्नी विरहात होते. त्यांनी मेघदूतमध्ये स्वत:च्याऐवजी शापित यक्षाची योजना नायक म्हणून केल्याचे दिसते. मेघदूताची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी होते. त्यामुळे आषाढातील पहिला दिवस ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ कालिदासांचा स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. साहित्यावर प्रेम असणाऱ्या लोकांसाठी तर हा दिन म्हणजे उत्सवच असतो. कालिदासांच्या मेघदूतावर रसिकांचे आणि जाणकारांचेही प्रचंड प्रेम आहे. येथे कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. गडमंदिर परिसरात कालिदासांचे ‘स्मारक’आणि ओम आहे. या दोन्ही वास्तूंची उपेक्षा आजही कायम आहे.
कालिदास हे आमच्या साहित्याचे आणि संस्कृतीचे दैवत असताना शासनाला मात्र महाकवी कालिदासांचा विसर पडला आहे. जागतिक स्तरावर कालिदासांच्या साहित्याला मान्यता आणि आणि त्यांच्या साहित्याचा अभ्यासही जागतिक स्तरावर केला जातो. पण त्यांचा निवास ज्या स्थानी राहिला तेथल्या प्रशासनाला मात्र अद्याप कालिदासांची किंमत कळलेली नाही.
महाकवी कालिदास हे उज्जैनचे राजे चंद्रगुप्त यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होत. चंद्रगुप्तांची राजकन्या प्रभावती गुप्ता हिचा विवाह नंदीवर्धन (आजचे नगरधन) येथील वाकाटक राजे पृथ्वीसेन यांचा पुत्र रुद्रसेन (द्वितीय) याच्यासोबत झाला. रुद्रसेन अल्पायुषी ठरल्याने राणी प्रभावती विधवा झाली. तिला राज्यकारभार चालविण्याचा अनुभव नसल्याने तिच्या मदतीकरिता कालिदासांना उज्जैनहून नंदीवर्धनला पाठविण्यात आले.
येथे कलाध्यासी कालिदासांचे मन रमत नव्हते. नंदीवर्धन (नगरधन)पासून दोन कोस अंतरावरील रामटेककडे ते आकर्षित झाले. ते रामगिरीवर वारंवार यायचे व येथेच रममाण व्हायचे. रामटेकचे निसर्गसौंदर्य त्यांना भुरळ घालायचे. अशाच एका आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात दाटून आलेल्या काळ्याकभिन्न मेघांकडे पाहून त्या मेघाला दूत बनविण्याची आणि त्या दूतामार्फत प्रेयसीला संदेश पाठविण्याची कल्पना त्यांना सुचली आणि यातूनच ‘मेघदूत’ हे खंडकाव्य जन्माला आले.
कालिदासांच्या जन्म व मृत्युविषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही. जी माहिती उपलब्ध आहे, त्यात दंतकथा अधिक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
कालिदासांच्या साहित्यकृतींमध्ये त्यांनी दर्शविलेले नीती व जीवनाचे तत्त्वज्ञान, योगशास्त्र, भौगोलिकशास्त्र, कृषिशास्त्र, वातमानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, सौंदर्यप्रसाधन व अलंकरण, कामशास्त्र, शृंगार, काव्यशास्त्र, व्याकरण व व्युत्पत्तीशास्त्र, वैदिक चिंतन, जोतिष्यशास्त्र, ललितकला, राजनितीविचार, शिक्षणविचार व रसात्मकता या सगळ्यांचा वेगळा अभ्यास संस्कृत अभ्यासकांचा स्वतंत्र विषय आहे. शृंगार हा महाकवींच्या साहित्य संपदेचा आत्मा आहे. ते विविध शास्त्रविद्यांमध्ये पारंगत होते. मेघदूताची निर्मिती रामटेकच्या रामगिरीवर करण्यात आल्याने राज्य शासनाने रामटेकला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची १९९७ साली स्थापना केली. गडमंदिरावर महाकवी कालिदासांचे स्मृतीस्मारक आहे. तत्कालीन सुधाकर नाईक यांच्या संकल्पनेतून कालिदास स्मारकाशेजारी ‘ओम’ची निर्मिती करण्यात आली. गुलाबी दगडांच्या ओममध्ये आरसपानी दगडांवर संस्कृत पंडित स्व. डॉ श्रीकांत जिचकारांनी मेघदूत कोरून घेतले. मनुष्यलोक आणि स्वर्गलोक या दोहोंचा समावेश पहायचा असेल तर, कालिदासांचे अभिज्ञात शाकुंतलम् हे नाटक अवश्य वाचावे, असे जर्मन कवी गठे म्हणतो. महाकवी कालिदासांच्या एकट्या मेघदूतांवर वीसपेक्षा अधिक अभ्यासकांनी शोधपुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत.