हृदयविकाराच्या रुग्णांची जीवघेणी प्रतीक्षा
By Admin | Updated: July 8, 2015 02:47 IST2015-07-08T02:47:08+5:302015-07-08T02:47:08+5:30
हृदयविकार हे भारतातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह यांचे भारतातील प्रमाण वाढत आहे.

हृदयविकाराच्या रुग्णांची जीवघेणी प्रतीक्षा
नागपूर : हृदयविकार हे भारतातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह यांचे भारतातील प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत मुख्यत: संसर्गजन्य रोगांवर भर देणाऱ्या शासकीय यंत्रणेला या रोगांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक वाटू लागले आहे, मात्र विदर्भात हृदयविकारावर उपचार होत असलेल्या एकमेव अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी रुग्णालय) सीव्हीटीएस व कार्डिओलॉजीचे आठवड्यातून केवळ दोनच दिवस रुग्णांची तपासणी (ओपीडी) होत असल्याने, ही प्रतीक्षा अनेक हृदयरुग्णांसाठी जीवघेणी ठरत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १९९८ साली तयार झाले. सध्या हृदयशल्यचिकित्साशास्त्र, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्यूरोसर्जरी), किडनीविकार (नेफ्रालॉजी), मूत्रपिंडरोग (यूरोलॉजी) व पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) अशा सात विभागातून रुग्णसेवा सुरू आहे.
कार्डिओलॉजीचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सोमवारी आणि गुरुवारीच सुरू असतो. सीव्हीटीएसची ओपीडी सोमवारी व गुरुवारी असते. यूरोलॉजीची ओपीडी सोमवारी, बुधवारी व शनिवारी असते. न्यूरोसर्जरीची ओपीडी सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी असते. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीची ओपीडी सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी असते, तर नेफ्रालॉजीची ओपीडी मंगळवार, गुरुवार व शुक्रवारी असते. ठराविक दिवसांपुरतेच हे विभाग मर्यादित असल्याने ओपीडीच्या दिवशी त्या त्या विभागासमोर लांबच लांब रांग लागलेली असते.
विशेषत: हृदयरोगाचे सर्वात जास्त रुग्ण उपचारासाठी येत असल्याने आणि आठवड्यातून केवळ दोनच दिवस ओपीडी राहत असल्याने रुग्णांची प्रचंड गर्दी होते. सकाळी ७ वाजतापासून रुग्ण रांगेत लागतात. ओपीडीची वेळ ९ ते १ वाजताची असताना २-३ वाजेपर्यंत ओपीडी चालते. इतर दिवशी उपचारासाठी येणाऱ्या हृदयरोगांना परत पाठविले जाते.
विशेष म्हणजे, मेडिकल रुग्णालयात भरती असलेल्या हृदयरुग्णाला विशेषज्ञाकडून तातडीची उपचाराची आवश्यकता असली तरी त्याला नेमून दिलेल्या दिवसाचीच वाट पाहण्याची वेळ येते. असेच चित्र इतरही विभागातील आहे. (प्रतिनिधी)