बुलडाण्यासह २९ जिल्हा परिषदांना मुदतवाढीची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 13, 2014 23:36 IST2014-08-13T23:27:55+5:302014-08-13T23:36:11+5:30
२९ जिप अध्यक्षांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपत आहे.आचारसंहितेमुळे मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

बुलडाण्यासह २९ जिल्हा परिषदांना मुदतवाढीची प्रतीक्षा
बुलडाणा : राज्यातील २९ जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर या काळात आचारसंहिता राहण्याची शक्यता असल्याने, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळही आचारसंहितेच्या काळात, म्हणजेच सप्टेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया या सहा जिल्हा परिषदा वगळल्या तर राज्यातील उर्वरित सर्व जिल्हा परिषदांमध्ये ही अडचण उभी ठाकली आहे. २00५ आणि २00९ च्या विधानसभा निवडणुकीत अशीच अडचण आली होती. त्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्षांना मुदतवाढ देण्यात आली होती. यावेळीही अशी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्य शासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला नाही तर २0 सप्टेंबर पूर्वी अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुका बुलडाण्यात घ्याव्या लागणार असून, विधानसभेसोबतच जिल्हा परिषदेचेही राजकारण चांगलेच तापणार आहे.
* आज शेवटची सर्वसाधारणसभा
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यकाळाची मुदत २0 सप्टेंबर रोजी संपत असून, अध्यक्षांना मुदतवाढ न मिळाल्यास आज होणारी सर्वसाधारण सभा ही विद्यमान पदाधिकार्यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा ठरू शकते. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात आज अध्यक्ष वर्षा वनारे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून, विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ही सभा होत आहे. विशेष म्हणजे आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जलसंधारण कामांचे लोकार्पण होत असून, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचीही गडबड प्रशासकीय वतरुळात आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकेल, या शक्यतेमुळे ही सर्वसाधारण सभा स्वातंत्र्यदिनापूर्वी घेण्यात आली असून उपाध्यक्ष व पदाधिकार्यांना आपल्या मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावण्याची घाई करावी लागणार आहे.