वेटर लवकर आला नाही, बार मॅनेजरला केले जखमी, आरोपीस अटक; फरार साथीदाराचा शोध सुरु
By दयानंद पाईकराव | Updated: July 8, 2023 19:34 IST2023-07-08T19:34:24+5:302023-07-08T19:34:51+5:30
दरम्यान आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरु केला आहे.

वेटर लवकर आला नाही, बार मॅनेजरला केले जखमी, आरोपीस अटक; फरार साथीदाराचा शोध सुरु
नागपूर : आवाज दिल्यानंतर वेटर लवकर न आल्यामुळे दोन आरोपींनी शिविगाळ करीत बारच्या मॅनेजरच्या डोक्यावर काचेचा ग्लास व पाठीवर स्टीलचा जग मारून त्यास जखमी केले. ही घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ जुले रोजी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरु केला आहे.
शेख सरफराज शेख आरीफ (वय २२, रा. दसरा रोड महाल) आणि फहाद नावाचा मुलगा (रा. श्रद्धा हॉटेलमागे, नवी शुक्रवारी) अशी आरोपींची नावे आहेत. यातील शेख सरफराजला पोलिसांनी अटक केली आहे. ७ जुलेला रात्री १०.४५ वाजता आरोपी महाल येथील राणा सन्स बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेले. तेथे आरोपींनी वेटरला आवाज दिला. परंतु वेटर लवकर न आल्यामुळे आरोपींनी वेटरला शिविगाळ करणे सुरु केले. त्यामुळे बारचे मॅनेजर भुपेंद्र अर्जुनदास मदान (वय ४९, रा. नाईक रोड, महाल) हे आरोपींना समजविण्यासाठी आले.
परंतु आरोपींनी संगणमत करून बार मॅनेजर मदान यांच्या डोक्यावर काचेचा ग्लास मारून व स्टीलच्या जगने त्यांच्या पाठीवर मारून त्यांना जखमी केले. जखमी बार मॅनेजरवर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध ३२४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरु केला आहे.