विद्यार्थ्यांची स्वाधार निधीची प्रतिक्षा संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST2021-01-19T04:09:18+5:302021-01-19T04:09:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अखेर नागपूर विभागाला शासनाकडून स्वाधार निधी प्राप्त झाला. स्वाधार योजनेंतर्गत विभागासाठी ५ कोटी ७१ ...

विद्यार्थ्यांची स्वाधार निधीची प्रतिक्षा संपली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखेर नागपूर विभागाला शासनाकडून स्वाधार निधी प्राप्त झाला. स्वाधार योजनेंतर्गत विभागासाठी ५ कोटी ७१ लाख रुपये पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे या निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच हा निधी लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती व बौद्ध कुटुंबातील मुलामुलींनी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मागितला. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. असे प्रवेश न मिळालेले विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून २०१७ पासून राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शासकीय वसतिगृहांत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली करून राहता येते. त्याचे भाडे शासनातर्फे दिले जाते. कोरोनाकाळात महाविद्यालये बंद होती. तरी विद्यार्थ्यांना घरभाडे मात्र भरावे लागत होते. शासनाकड़ून स्वाधारचा निधी न आल्याने अनेक विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. नागपूर विभागात सुमारे तीन हजार विद्यार्थी स्वाधार निधीच्या प्रतीक्षेत होते. सध्या हा निधी विभागाला प्राप्त झाला असून, तो विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.