'Vyaghramitra' will conserve Tiger & Forest: : Appointment in Pawni Forest Territory | ‘व्याघ्रमित्र’ करणार वाघ व जंगलाचे संवर्धन : पवनी वनपरिक्षेत्रात नेमणूक 
‘व्याघ्रमित्र’ करणार वाघ व जंगलाचे संवर्धन : पवनी वनपरिक्षेत्रात नेमणूक 

ठळक मुद्देवनविभागाच्या संकल्पनेला पहिल्यांदा सुरुवात

लोकमत न्यूज  नेटवर्क
नागपूर : जंगले, वाघ व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जंगलांना लागून असलेल्या गावागावात व्याघ्रमित्र तयार करण्याची संकल्पना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या संकल्पनेची पहिली सुरुवात पवनी वनपरिक्षेत्रातून करण्यात आली. वनविभागातर्फे या वनपरिक्षेत्रालगतच्या गावातील काही तरुणांची व्याघ्रमित्र म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे व्याघ्रमित्र आता वनकर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जंगलाच्या संवर्धनासाठी काम करणार आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी नागपूर वनविभागाच्या पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलालगतच्या गावातील काही तरुणांना व्याघ्रमित्र म्हणून नेमण्यात आले. हे तरुण गेल्या वर्षभरापासून वन कर्मचाऱ्यांसोबत व्याघ्र आणि जंगल संरक्षणासाठी अविरत काम करत आहेत. नागपूर स्थित हेरिटेज कंझर्व्हेशन सोसायटीच्या वन्यजीव संवर्धन विभागाच्या माध्यमातून या सगळ्यांना व्याघ्रमित्राचा गणवेशही देण्यात आला. वन कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे जवान आता एका विशिष्ट गणवेशात दिसतील. ही संकल्पना तशी जुनी आहे. वनसंवर्धनासाठी व्याघ्रमित्र तयार करायचे होते, मात्र अद्यापपर्यंत कुणी पुढाकार घेतला नव्हता. पहिल्यांदा नागपूर वनविभागातर्फे वाघांचे अस्तित्व असलेल्या वनपरिक्षेत्रात असे व्याघ्रमित्र नेमणे सुरू करण्यात आले. नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, सहायक वनसंरक्षक विशाल बोराडे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके आणि रितेश भोंगाडे या सगळ्यांच्या पुढाकाराने राज्यात पहिल्यांदा व्याघ्रमित्रांची संकल्पना अमलात आणण्यात आली आहे.
वने व वन्यजीव संवर्धनात आपलाही सहभाग देण्यासाठी हेरिटेज कंझर्व्हेशन सोसायटीच्या लीना झिलपे यांनी व्याघ्रमित्रांना गणवेश देण्यासाठी पुढाकार घेतला. वने आणि वन्यजीव हेसुद्धा आपले हेरिटेज आहेत, त्यामुळे हेरिटेज सोसायटी व वन्यजीव संवर्धन विभाग सदैव तत्पर राहील असे मत संस्थेच्या लीना झिलपे यांनी व्यक्त केले. यापुढेही संस्था वन्यजीव आणि वनसंवर्धन व संरक्षणासाठी काम करीत राहील, असा विश्वास त्यांनी दिला.


Web Title: 'Vyaghramitra' will conserve Tiger & Forest: : Appointment in Pawni Forest Territory
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.