मतदारयादीतील गोंधळामुळे मतदारांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:13 AM2020-12-02T04:13:04+5:302020-12-02T04:13:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये यंदा उत्साह दिसून आला. मात्र मतदारयादीतील गोंधळामुळे ...

Voters are upset due to confusion in the voter list | मतदारयादीतील गोंधळामुळे मतदारांना मनस्ताप

मतदारयादीतील गोंधळामुळे मतदारांना मनस्ताप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये यंदा उत्साह दिसून आला. मात्र मतदारयादीतील गोंधळामुळे अनेक मतदारांच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले. अनेकांचे यादीमध्ये दोन ते तीन वेळेला नाव होते. त्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. शिवाय अनेकांना घरापासून दूर असलेले मतदान केंद्र मिळाले होते. त्यामुळे मतदारांनी प्रशासकीय कारभारावर नाराजी व्यक्त केली.

‘कोरोना’ संक्रमणामुळे मागील वेळेहून कमी मतदान होईल की काय असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र मतदारांनी सकाळपासूनच उत्साह दाखविला. काही मतदान केंद्रांवर तर लांबलचक रांगा होत्या व त्यामुळे अनेक मतदार घरी परतले व गर्दी ओसरल्यावर मतदानासाठी आले.

प्रेमनगर हिंदी प्राथमिक शाळेत बनलेल्या मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे यादीमध्ये दोनहून अधिक ठिकाणी होती. त्यामुळे एका मतदाराने कशाला हवी ही कटकट असे म्हणत मतदान न करण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय अनेक मतदारांची नावे दूरच्या केंद्रांवर होती. जरिपटका येथील महात्मा गांधी सेंटेनियल हायस्कूलमध्ये तर लक्ष्मीनगरातील मतदारांची नावे होती. पदवीधर निवडणुकीच्या नियमानुसार १६ किलोमीटरपर्यंत मतदारांना केंद्र मिळू शकते. त्यामुळे केंद्राचे वाटप नियमाप्रमाणेच झाले होते, परंतु मतदारांची नाहक पायपीट झाली.

एकाच कुटुंबातील लोकांना वेगवेगळी केंद्र

मतदार यादीतील गोंधळाचा फटका अनेक कुटुंबांनादेखील पडला. एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर होती. शिवाय बऱ्याच कुटुंबातील अर्ध्याच जणांची मतदारयादीत नावे होती.

उन्हात उभे रहावे लागले

वर्धमाननगर स्थित ‘व्हीएमव्ही’ महाविद्यालयात अनेक मतदारांना उन्हात उभे रहावे लागले. मतदार केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’साठी जमिनीवर गोल खूण करण्यात आली होती. गर्दी जास्त झाल्याने लोकांना बाहेर उभे रहावे लागले. अधिकाऱ्यांनी नंतर त्यांना आत येण्याची परवानगी दिली.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर चोख तपासणी

मतदान केंद्रांवर ‘कोरोना’च्या नियमावलीचे पालन करण्यावर जास्त भर होता. मतदान केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ची काळजी घेण्यात आली होती. प्रत्येक मतदाराला अगोदर हातावर ‘सॅनिटायझर’ देण्यात येत होते व त्यानंतर त्यांचे ‘थर्मल’ माध्यमातून तापमान तपासण्यात येत होते. काही मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथकदेखील होते.

‘सॅनिटायझर’चे करणार काय ?

काही मतदान केंद्रांवर ‘सॅनिटायझर’चा मोठ्या प्रमाणावर ‘बॉटल्स’ पाठविण्यात आल्या होत्या. मात्र मतदारांची संख्या मर्यादित असल्यामुळे अनेक ‘बॉटल्स’ उरल्या होत्या. प्रतापनगरातील ‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’ येथील मतदानकेंद्रावर दुपारी २.२५ वाजेपर्यंत ‘सॅनिटायझर’ची केवळ अर्धीच ‘बॉटल’ संपली होती. उरलेले ‘सॅनिटायझर’ खरोखर परत होणार का असा प्रश्न तेथील मतदारांनी उपस्थित केला.

Web Title: Voters are upset due to confusion in the voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.