सुरक्षेमुळे स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही; सरसंघचालक मोहन भागवत यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2023 22:13 IST2023-06-26T22:12:48+5:302023-06-26T22:13:19+5:30
Nagpur News या सुरक्षेमुळे अनेकदा स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही ही खंत सरसंघचालक मोहन भागवत यांनासुद्धा असल्याची बाब सोमवारी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.

सुरक्षेमुळे स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही; सरसंघचालक मोहन भागवत यांची खंत
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केंद्र सरकारतर्फे झेड प्लस सुरक्षा मिळालेली आहे. या सुरक्षेमुळे अनेकदा स्वयंसेवकांना त्यांना सहजपणे भेटता येत नाही. ही खंत केवळ सर्वसामान्य स्वयंसेवकांचीच नाही तर सरसंघचालक मोहन भागवत यांनासुद्धा हीच खंत असल्याची बाब सोमवारी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.
निमित्त होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिवंगत डॉ. श्रीकांत उपाख्य राजाभाऊ शिलेदार यांच्या निधनानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवाजीनगर शाखेतर्फे शंकरनगर येथील साई सभागृहात सोमवारी ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विवेकानंद मेडिकल मिशन खापरीचे श्रीकांत अंधारे, रमेश शिलेदार व अजय शिलेदार व्यासपीठावर होते.
यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिवंगत डॉ. श्रीकांत उपाख्य राजाभाऊ शिलेदार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा सादर करीत त्यांच्या कार्यापासून आजच्या स्वयंसेवकाने प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. राजाभाऊ हे स्पष्टपणे बोलायचे. असाच एक किस्सा सांगताना भागवत म्हणाले, एकदा राजाभाऊ सुरक्षेच्या मुद्यावरून म्हणाले, आता सरसंघचालकांना सहजपणे भेटताही येत नाही. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ही सर्व काही (सुरक्षा) मी मागून घेतलेली नाही. ती माझ्या गळ्यात पडली. मी सोडतो म्हटले तरी ते झाले नाही. त्यांनी माझी बाजू समजून घेतली. त्यांच्या मनासारखे झाले नाही म्हणून त्यांनी कधी ढिंढोरा पिटला नाही.
मुळात आहे तशा परिस्थितीत काम करीत राहणे हीच संघाची शिकवण व पद्धत आहे, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. संचालन विनय मोडक यांनी केले.